विजय शिंदे
राष्ट्रवादीत अमोल मिटकरी आणि पार्थ पवार यांच्यात जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्याचे कारण असे की महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजित पवारांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या इव्हेंट कंपनी डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला व तो पोस्ट केला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अरोरा यांच्यावर टीका सुरु केली होती. इव्हेंट कंपनीमुळेच अजित पवारांना यश मिळाले असा मेसेज जनतेत जातो, असे त्यांचे म्हणणे होते. यावरून मिटकरींनी देखील अरोरा यांच्यावर टीका केली होती.
विधानसभा निवडणुकीत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळालं हे कोणत्या पीआर कंपनीमुळे मिळाले नाही असे म्हणत हे केवळ अजित पवारांचे यश आहे, असे मिटकरींनी ट्विट केले होते. यावरून आज पार्थ पवारांनी मिटकरींना सुनावले आहे. राष्ट्रवादी पक्षानेही हे मिटकरींचे वैयक्तीक मत आहे, असे म्हटले होते.
मिटकरी काय म्हणालेले…
हे सगळे खोटे आहे. डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी, ती काही फुकट काम करायला आली नव्हती. अशा प्रकारच्या तीन एजन्सी एकनाथ शिंदेंच्या सोबत होत्या. त्या कुठे दिसल्या का? त्यांच्या पक्षाला ५१ जागा मिळाल्या. त्यावेळी कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेंच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढायची? तो दादांच्या बाजूला येतो, बुके देतो आणि खांद्यावर हात ठेवतो. आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत. आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीने स्वतःला लाँच करण्याचा प्रयत्न केला. विजयाचे श्रेय आपल्याकडे घेतले, अशी टीका मिटकरींनी केली होती. मी जबाबदारीने बोलतोय, आमच्या भावना दुखल्या त्याचं काय? पवार साहेबांच्या खांद्यावर हात ठेवायची कुणाची हिंमत झाली नाही. अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कोण कुठला बाहेरच्या राज्यातला माणूस येतो. त्याची पीआर कंपनी लाँच करण्यासाठी म्हणतो की हे आमचं यश आहे. मग ४१ आमदार निवडून आले ते, त्यांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, सोशल मीडिया हे काय झोपत होते का? असा सवाल मिटकरींनी केला होता.
यावर आता पार्थ पवार यांनी अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेचे सदस्य असूनही डिझाईन बॉक्स आणि नरेश अरोरा यांच्याबाबत पक्षविरोधी भुमिका घेतली आहे ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. माझे वडील अजित पवार आणि पक्ष मिटकरी यांच्या वक्तव्याशी मुळीच सहमत नाही. त्यांनी अशी वक्तव्ये करण्यापासून दूर रहावे असे आवाहन करतो, असे पार्थ पवारांनी म्हटले आहे.