भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांचे नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित.

विजय शिंदे 

राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी असणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

अशातच भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचे नाव विधीमंडळ गटनेता म्हणून निश्चित झालं आहे. त्यामुळे गुरुवारी राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे चित्र स्पष्ट झाले आहे.

या बैठकीनंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. भाजप पक्ष निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमन हे विधीमंडळात पोहोचले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन निर्मला सीतारमन आणि विजय रुपाणी यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यानंतर आता गटनेतेपदाचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडले. तर पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर आणि रविंद्र चव्हाण आदी आमदारांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले. यानंतर सर्व आमदारांनी बाक वाजवत याला संमती दर्शवली.

दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असून महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here