विजय शिंदे
महायुतीतील राष्ट्रीय समाज पार्टीचे नेते महादेव जानकर गेल्या काही दिवसापासून चांगलचे चर्चेत आले आहेत. महादेव जानकर महायुतीला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अशातच आता जानकर यांनी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार का ? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यातच जानकरांनी शरद पवारांना पाठिंबा दिला तर महायुतीला हा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अलिकडेच भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची घोषणा केली आहे. यातच माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीकडून माढा मतदारसंघ हा शरद पवारांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. यातच जानकर सोबत आल्यास त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल अशीही चर्चा होती. यातच आज जानकर पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या भेटीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
दुसऱ्या बाजूला महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्याचा बारामतीत मोठा फायदा मिळू शकतो. बारामती मतदारसंघात जानकर समर्थक मोठ्या प्रमाणात असून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर महायुतीत खळबळ उडाली आहे. तर जानकरांनीही महायुतीची साथ सोडली तर बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय पक्का मानला जात आहे. त्यामुळे जानकर यांना माढा लोकसभेची उमेदवारी देऊन शरद पवार बारामती ची जागा सेफ करणार का ? तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.