विजय शिंदे
गेल्या अडीच, तीन वर्षात निवडणुकाच झाल्या नसल्याने अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज आहे. परंतु आता हे प्रशासक राज संपणार असल्याचे दिसते. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
ग्राम विकास विभागाकडून याबाबतचा आदेश काढण्यात आला. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात मुदत संपणाऱ्या व नवीन अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच जाहीर केल्या नाही. यामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीबाबत येथील नागरिकांना मोठी उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, अशी चर्चा होती. ग्रामपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.