विजय शिंदे
बांग्लादेश येथे हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात दि. १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त ” मानवाधिकार मूक मोर्चा” काढण्याची परवानगी मिळावी यासाठी सकल हिंदू समाज इंदापूर शहर व परिसर यांच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनावर सकल हिंदू समाज यांच्या वतीने महेश बोधले व किरण गानबोटे यांच्या सही आहेत.
या निवेदनात म्हटले आहे संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय करार यांनी एकमेकांशी जोडले गेले आहे. बांगलादेशमध्ये हिंदुंवर ठरवून होत असलेले अत्याचार आज संपूर्ण जग बघते आहे आणि त्याचा ठिकठिकाणी निषेध देखील होत आहे. भारतीय संविधानाने देखील भारतीय नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने निषेध आणि रोष व्यक्त करण्याचा अधिकार/हक्क दिला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत असणारी भूमिका घेणे आणि राष्ट्रहितार्थ भूमिका घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारताने राष्ट्र म्हणून मानवी हक्कांच्या सार्वभौमिक घोषणापत्रावर १९४५ साली स्वाक्षरी केली आहे. भारताने एक राष्ट्र म्हणून कायम मानवाधिकारांचा पुरस्कार केला आहे.
आज भारतातील सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांचा सन्मान करणे हे आमचे आम्ही कर्तव्य समजतो. बांग्लादेश मध्ये होत असलेले हिंदुंवरील अत्याचार हे मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहेत. हिंदुंवर होत असलेल्या अमानुष अत्याचारांचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीचा निषेध करणे हा आमचा संवैधानिक हक्क आणि आमचे राष्ट्रीय कर्त्यव्य आहे. सदरील “मानवाधिकार मूक मोर्चाचा” हेतू हा भारतीय समाजात मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. बांग्लादेश मध्ये हिंदुंवर झालेल्या व चालू असलेल्या अमानुष अत्याचाराने मानवाधिकारांचे झालेले उल्लंघन नागरिकांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. सामान्य नागरिकांमध्ये मानवाधिकार संरक्षणाच्या गरजेची जाणीव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. या “मानवाधिकार मूक मोर्चात” प्रातिनिधिक स्वरुपात प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल ज्याद्वारे संपूर्ण समाज आपल्या भावना सरकार पर्यंत पोहचवेल.
दिनांक १०/१२/२०२४ रोजी आम्ही “मानवाधिकार मूक मोर्चा” काढत असताना ती संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने व कुठल्याही प्रकरचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. तरी सदरील “मानवाधिकार मूक मोर्चात” पोलीस प्रशासनाने पूर्व परवानगी देऊन सहकार्य करावे !
या मूक मोर्चास पोलीस प्रशासन परवानगी देते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.