विजय शिंदे
इंदापूर : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील अगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात खासदार सुळे यांनी म्हटले आहे की, अगोती ते गोयेगाव वाशिंबे हे अंतर अवघे ४ किलोमीटर आहे. उजनी जलशयामुळे या दोन गावांतील नागरिकांना भिगवण- टेंभुर्णी मार्गे वळसा मारुन रस्त्यामार्गे तब्बल ९० ते १०० किलोमीटर इतके अंतर प्रवास करुन जावे लागते.पैसे व वेळेच्या बचतीसाठी लोक होडीतून प्रवास करतात. परंतू हा प्रवास धोकादायक आहे. यापूर्वी अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उजनी जलाशयात अगोती ते गोयेगाव -वाशिंबे दरम्यान पुल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. त्यामुळे ठिकाणी पूल अत्यावश्यक असल्याचे खा.सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते अगोती दरम्यान नदी पात्रातून बैलगाडी द्वारे वाहतूक होत असे. सध्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे. गोयेगाव ते अगोती दरम्यान भीमा नदीच्या पात्राची रुंदी ही कमी आहे. दोन्ही किनाऱ्यापर्यंत रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे जमीन संपादनाची ही आवश्यकता भासणार नाही. दोन्ही बाजूकडुन तीनशे ते चारशे मीटर पर्यंतचे भराव भरून मुख्य नदी पात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल. स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार विचार करता या ठिकाणी पूल बांधण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात शेवटी नमूद करण्यात आले आहे.