विजय शिंदे
महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये. महाविकास आघाडीने एकमेकांना पाडण्याचे जे काम केले आहे, त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला आहे. म्हणून आता ना नाना पटोले त्यांना भेटणार, ना उद्धव ठाकरे त्यांना भेटणार, कुणीही कुणाला भेटणार नाही.
वेगवेगळ्या चेहऱ्यांकडे त्यांच्या माना झालेल्या आहेत आणि शरद पवार कधी काय निर्णय घेतील, हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आतच तुम्हाला कळेल, असे शिवसेना (ES) नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. ते नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते.
शरद पवार काय निर्णय घेतील ते सांगता येत नाही, शरद पवार वेगळा निर्णय घेऊ शकतात का? असा प्रश्न केला असता, शिरसाट म्हणाले, “शरद पवार आहेत ते. तुम्हाला कुठे दिसतायत? सुप्रियाताई बोलताना दिसत आहेत का? त्यांचे कुणी आणखी प्रवक्ते बोलताना दिसतायत? याचे अर्थ समजून घ्या, जेव्हा ते सर्व शांत असतात तेव्हा समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे.” यावर, वादळाचा अर्थ काय? असा प्रश्न केला असता, ते म्हणाले, “वादळाचा काही अर्थ नसतो, वादळ हे कुणालाही उद्ध्वस्त करत असतं,” असेही शिरसाट म्हणाले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आठ खासदार असल्याने दिल्लीच्या राजकारणात त्यांचे अधिक महत्त्व असल्याचे यावेळी ते म्हणाले.