पुण्याचे पालकमंत्री .? दोन्ही दादा की अनपेक्षित पणे दत्तामामा..

विजय शिंदे 

आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर खातेवाटप आणि आता पालकमंत्री कोण होणार?यावरून काही मंत्र्यांनी दावे सुरू केले आहेत. एकाच जिल्ह्यात अनेकांना मंत्रिपद मिळाल्याने पालकमंत्रिपदावरून महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. खातेवाटपानंतर आता पालकमंत्रिपदावरून सत्ताधारी नेत्यांमध्ये दावेदारी रंगणार आहे. एकाच जिल्ह्यात अनेकांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडल्यामुळे पालकमंत्री कोण होतो.?

पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे, हेच पालकमंत्री पद भाजपकडे राहावे अशी आग्रही भूमिका उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची असल्याचे समजते. अजित पवार हे युतीत सहभागी होण्याआधी पुण्याचे पालकमंत्रिपद चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडेच होते. आताही पुण्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

महायुतीमध्ये पुण्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे गेले व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला तर अनपेक्षित पणे पुण्याच्या पालकमंत्री पदी क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांना संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे महायुतीच्या वाटपामध्ये राष्ट्रवादीकडे राहिले तर चंद्रकांतदादा पाटील यांना सोलापूर किंवा सांगली जिल्ह्याची जबाबदारी मिळू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे आव्हानात्मक असणाऱ्या जिल्ह्यांची जबाबदारी स्वीकारू शकतात. तसे झाले तर अजित पवार यांचे विश्वासू असणारे दत्तात्रय भरणे हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालकमंत्री पद का महत्वाचं?

पालकमंत्री नावातच ‘पालक’ शब्द आहे. म्हणजे त्या मंत्र्याकडे जिल्ह्याचं पालकत्व येतं. जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती असो किंवा कुठलीही योजना असो. लोकोपयोगी कामे असोत किंवा एखादा शासकीय कार्यक्रम असो पालकमंत्री या सर्वांच्या केंद्रस्थानी असतो. जिल्ह्याच्या विकासावर देखरेख करण्याचं काम पालकमंत्री करतात. जिल्ह्याचे प्रशासन व्यवस्थित आणि पूर्ण कार्यक्षमतेने काम करत आहे किंवा नाही याची खात्री पालकमंत्री करत असतात. सरकार आणि प्रशासन यांच्यातील एक महत्वाचा धागा म्हणून पालकमंत्री काम करतात.

जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष पालकमंत्री असतात. या समितीत आमदार, जिल्हा परिषदेचे सदस्य हे सदस्य असतात. मोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण, एक्सप्रेस वे, विमानतळ, रेल्वे, एमआयडीसी यांसह अन्य मोठ्या योजनांत पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्वाची असते. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारकडून मिळणारा निधी आणि या संस्थांकडून तयार केला जाणारा अर्थसंकल्प यांवरही पालकमंत्र्यांचा प्रभाव जाणवतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here