विजय शिंदे
ज्या शाळेत शिकलो, खेळलो, मोठं झालो, ते माजी विद्यार्थी १८ वर्षांनंतर एकत्र आल्याने अनेकांचे डोळे आनंदाश्रृंनी पाणावले होते. इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल विद्यालयाच्या २००५-२००६ दहावीच्या बॅचच्या आठवणी पुन्हा जागविण्यासाठी राज्यभर विखुरलेल्या तसेच इतर देशातही कामानिमित्त असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मेळाव्यास आवर्जून हजेरी लावली होती.
यावेळी तत्कालीन हयात नसलेल्या शिक्षक व सहकारी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर विद्यालयाचे तत्कालीन सर्व शिक्षक मुख्याध्यापक व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
१८ वर्षांनी एकमेकांविषयी दाखवलेल्या आपुलकीचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी सांगत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. वय, पद, प्रतिष्ठा व व्यस्त दिनक्रम हे सर्व बाजूला ठेवून मैत्रीची भावना जोपासत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्साहात एकत्र जमले होते. तब्बल १८ वर्षांनी भेटत असल्याने एकमेकांची ओळख लागते का नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. परंतु, एकत्र आले, भेट झाली अन् सर्वांनी जल्लोष केला. यावेळी सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. एकत्रित केलेला अभ्यास, शिक्षकांचा वचक, खेळांच्या स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, नवनवीन उपक्रम अशा अनेक गप्पांच्या ओघात विद्यार्थी रमले असल्याचे दिसून आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी एकत्र बसून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तसेच एकमेकांना पुढील वाटचालीसाठी निरोगी व आनंददायी जीवनासाठी शुभेच्छा देत निरोप घेतला.
यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी घड्याळ व विद्यार्थिनी सॅनिटरी पॅड मशीन या वस्तू देण्यात आल्या.
या स्नेह मेळाव्याचे अध्यक्षस्थान शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक श्री गुजर सर यांनी भुषवले तर यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तत्कालीन सर्व शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.