विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीआधी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सुहास दिवसे यांच्याकडे सोपवण्यात आली होती.राजेंद्र देशमुख यांच्या जागी दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली होती.पण महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आता त्यांनी आयएएस अधिकार्यांच्या बदल्यांचा धडाकाच लावला आहे.पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची अवघ्या अकरा महिन्यांतच बदली करण्यात आली आहे. त्यांच्याजागी जितेंद्र डुडी हे नवे जिल्हाधिकारी असणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (पुणे) या पदावर पदोन्नती झाली आहे. साताऱ्याचे कलेक्टर जितेंद्र डुडी हे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.
तर संतोष पाटील यांची बदली सातारा जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली आहे. डुडी यांना पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.त्यांच्या जागी क्रीडा आयुक्त म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होते. हे दोन्ही अधिकारी पुण्यात होते आणि बदलीनंतरही पुण्यात राहिले होते. तसेच विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गुडबुकमधील असल्याचे बोलले जात होते.
एकीकडे महायुती सरकारमध्ये काही मंत्र्यांनी अ्द्यापही आपल्या खात्याचा पदभार स्विकारला नसल्याचे समोर येत आहे. पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील घटक पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी अजित पवार हे अत्यंत आग्रही आहेत.
राज्य सरकारकडून गुरुवारी (ता.2 जानेवारी) सुहास दिवसे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. त्यांच्या जागी आता जितेंद्र डुडी यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजितदादांनी पुन्हा एकदा पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी ताकद लावली असतानाच आगामी महापालिका निवडणुकांच्या धर्तीवर आता भाजपनेही पुण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मर्जीतील जितेंद्र डुडी यांना पुण्यात आणून थेट जिल्हाधिकारीपदाच्या खुर्चीवर बसवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आता अजित पवारांच्या पुण्यावरील वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.