गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार;क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.

विजय शिंदे 

मुंबई, दि. 7: खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच युवा पिढीमध्ये खेळाची रूची वाढावी यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर राज्यात गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणार असून क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितले.

आज मंत्रालयातील दालनात मंत्री श्री. भरणे यांनी पदभार स्विकारला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा, युवक कल्याण विभाग, अल्पसंख्याक, औकाफ विभागाच्या माध्यमातून राज्याच्या प्रगतीत भरीव योगदान देणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अल्पसंख्याक घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार आहे.

क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

यावेळी जलतरण क्रीडा प्रकारात योगदान देणारे पद्मश्री मुरलीधर पेटकर यांना केंद्र शासनाच्यावतीने अर्जुन (जीवन गौरव) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंत्री श्री. भरणे यांनी सन्मानित केले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शक दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, गोळाफेक क्रीडा प्रकारात सचिन खिल्लारी यांना अर्जुन पुरस्कार, शुटींग क्रीडा प्रकारात स्वप्निल कुसाळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंत्री श्री. भरणे यांनी सन्मानित केले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळवित देशाबरोबर राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत मंत्री श्री. भरणे यांनी पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here