शेटफळ तलावातुन मिळणार चार सिंचन आवर्तने – कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

विजय शिंदे 

शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक आज दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत, पुणे येथील नविन सर्किट हाऊस येथे संपन्न झाली.

शेटफळ तलावात आज रोजी उपलब्ध असलेल्या ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्यातून रब्बी हंगामासाठी एक आवर्तन व उन्हाळा हंगामासाठी तीन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने नियोजन केले असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पावसाळा संपून दोन महिने झाले असून सध्या रब्बीच्या पिकासाठी पाण्याची गरज भासत आहे. शेटफळ तलावातून दिनांक १४/०१/२०२५ पासून आवर्तन सोडण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना श्री. भरणे यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करून अधिकारी व कालवा निरीक्षक यांनी अतिशय गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी थकीत पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले. कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे वीर धरणातील अतिरिक्त पाण्यातून कमी कालावधीत शेटफळ तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी निरा डावा कालव्याची वितरिका क्रमांक ५९ व शेटफळ इनलेटची वहन क्षमता वाढवण्यासाठीचे काम करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा, असेही क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री. भरणे यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सांगितले. त्यास श्री. दि. म. डुबल कार्यकारी अभियंता पुणे पाटबंधारे विभाग पुणे यांनी उचित कार्यवाही तात्काळ करण्यात येईल असे सांगितले.

गेल्या वर्षी व चालू खरी खरिप हंगामामध्ये पुणे पाटबंधारे विभागाने केलेल्या सिंचन नियोजनामुळे शेटफळ तलावातील सर्व लाभधारकांनी समाधान व्यक्त केले. बैठकीला पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष दत्ता घोगरे, शिवाजी हांगे, पंडितराव पाटील,महादेव घाडगे ,संतोष पाटील , बाळासाहेब करगळ ,अजित टिळेकर व इतर लाभधारक उपस्थित होते.

 

श्री दि. म. डुबल, कार्यकारी अभियंता तथा अध्यक्ष शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती व श्री. दशरथ इकतपुरे, उपविभागीय अभियंता तथा सदस्य सचिव शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समिती हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here