विजय शिंदे
कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरने मुख्य बाजार इंदापूर शिवलीलानगर, डाळींब मार्केट अकलूज रोडलगत इंदापूर येथील अद्यावत मार्केटमध्ये इंदापूर कृषी महोत्सव-२०२५ अंतर्गत दि. २२ ते २६ जानेवारी असा पाच दिवसीय कृषी, पशु-पक्षी, जनावरे व डॉग शो तसेच घोडेबाजार आयोजन केलेले आहे.
कृषी प्रदर्शनाचे हे पाचवे वर्षे असून तालुक्यातील नागरिकांनी कृषी प्रदर्शन पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीचे मार्गदर्शक व पुणे जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, सभापती तुषार जाधव यांनी इंदापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
बाजार समितीचे इंदापूर कृषी महोत्सव अंतर्गत कृषी प्रदर्शनात शेती उत्पादने, बी-बियाणे, शेती औजारे-साधने, ऑटो मोबाईल्स, गृहउपयोगी आवश्यक वस्तू तसेच शेती, कृषी अनुषंगिक यांत्रिक साहित्य याबाबतचे कृषी प्रदर्शन २५० स्टॉल, ५० खाद्य स्टॉल, पशु-पक्षी, जनावरे प्रदर्शन आणि पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार आप्पासाहेब जगदाळे यांचे संकल्पनेतून होत असलेचे सभापती तुषार जाधव यांनी सांगितले.
तसेच घोडे चाल (रवाल), नाचकाम स्पर्धा शिवाय स्मार्ट घोडे नर-मादी, नुकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
शेतकरी बांधव दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्ती यावर मात करून ऊस शेती, फळबाग, भाजीपाला, भुसार वगैरे उत्पादने घेत असून त्यांच्या शेतीविषयक लागवड व उत्पादनास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्यांचे शेती व शेतीपूरक व्यवसाय उत्पादनात वाढ व्हावी या उद्देशाने बाजार समितीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याचे आप्पासाहेब जगदाळे म्हणाले.
इंदापूर बाजार समिती ही भुसार, मासे (मासळी), डाळींब, कांदा, पेरू, ड्रॅगन, सीताफळ यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ असून समितीने शेतकर्यांसाठी अद्यावत सर्व सोयीयुक्त हक्काची बाजारपेठ उपलब्ध केलेली आहे. कृषी प्रदर्शनात नामांकित कंपनीचे शेती साधने, उत्पादने वगैरे शेती अनुशंगिक स्टॉल उभारणी करण्यात येत आहे.
यावेळी बाजार समितीचे मार्गदर्शक पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सभापती तुषार जाधव, उपसभापती मनोहर ढुके, संचालक माजी आमदार यशवंत माने, विलासराव माने, मधुकर भरणे, रोहित मोहोळकर, संग्रामसिंह निंबाळकर, दत्तात्रय फरतडे, अनिल बागल, आबा देवकाते, रुपालीताई संतोष वाबळे, मंगलताई गणेशकुमार झगडे, दशरथ पोळ, संतोष गायकवाड, संदिप पाटील, रोनक बोरा, सुभाष दिवसे, सचिव संतोष देवकर उपस्थित होते.