विजय शिंदे
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील अमृता लालासाहेब शिर्के या विद्यार्थिनीने राज्यात दुसरा क्रमांक घेत यश मिळवले आहे. या निकालानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ या परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २ व ३ जानेवारी २०२५ आणि ७ ते १० जानेवारी २०२५ आणि १५ व १६ जानेवारी २०२५ रोजी नवी मुंबई केंद्रावर घेण्यात आल्या होत्या.त्यानंतर संबंधित उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे डॉ. मलकप्पा मुरग्याप्पा पाटील व इतर प्रकरणी न्यायाधिकरणाने २० जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तसेच विविध न्यायाधिकरणे, उच्च न्यायालय, मुंबई आणि सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे सदर परीक्षेबाबत दाखल प्रकरणांच्या अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आली असे आयोगाने सांगितले आहे.
अन्न व औषध प्रशासकीय सेवेमध्ये राज्यातून प्रदीप वसंत आंबरे हा उमेदवार राज्यात पहिला आला आहे. इतर मागासवर्ग प्रवर्गातील हा उमेदवार असून त्याला ३०२ गुण मिळाले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील अमृता लालासाहेब शिर्के तर तिसऱ्या क्रमांकावर प्रणव चंद्रकांत मोरे आला आहे. आयोगाने ६१५ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. तसेच या उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.
अमृता शिर्के यांचे वडील लालासाहेब शिर्के हे इंदापूर येथील निरा -भीमा सहकारी साखर कारखान्यात कार्यरत आहेत. अमृता यांच्या यशानंतर सर्व ग्रामस्थ व नातेवाईकांनी अमृता यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
नीरा -भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के व सोसायटीचे चेअरमन महेश शिर्के यांनीही अमृता शिर्के यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.