वाचन हे केवळ करमणुकीचे साधन नसून, विचारांचा जिवंत प्रवाह;इंदापूरच्या साहित्य संस्कृतीला नवा आयाम : पहिल्या बालसाहित्य संमेलनाचा उत्सवी सोहळा संपन्न.

विजय शिंदे 

वाचन हे केवळ करमणुकीचे साधन नसून, विचारांचा जिवंत प्रवाह आहे असे मत इंदापुर शहरात झालेल्या पहिल्या बालसाहित्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी व्यक्त केले.

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती पद्माताई भोसले, सचिव गिरीष देसाई, खजिनदार तुषार रंजनकर व विश्वस्त अरविंद गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुरातील पहिल्या बालसाहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले.

बालवाचन संस्कृतीला व बालकांच्या कलागुणांना नवीन दिशा देण्यासाठी या बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कोपीवरची शाळा व बालसंस्कार वर्ग यांसह इंदापूर शहरातील शेकडो विद्यार्थ्यांनी या अनोख्या सोहळ्यात सहभाग घेतला.

यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. ज्ञानेश्वर जाधवर, प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार विजेते डॉ. संगीता बर्वे व श्री. संजय वाघ, तसेच प्रकाशक व लेखक नवनाथ जगताप यांनी आपले मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

सकाळच्या सत्राची सुरुवात एका अनोख्या आणि प्रेरणादायी ग्रंथदिंडीने झाली. कोवळ्या उन्हात टपटपणाऱ्या बालमनांनी पुस्तकांची पालखी काढत, “वाचन करा, ज्ञान वाढवा” अशा घोषणा देत, वाचन संस्कृतीच्या प्रसाराचा वसा घेतला. ही दिंडी केवळ पुस्तके हातात घेऊन निघालेली परंपरा नव्हती, तर ही होती वाचनाची गंगाजळी पुढील पिढीपर्यंत वाहून नेणारी चळवळ!

पहिल्या सत्रात संमेलनाचे अध्यक्ष राजीव तांबे, डॉ. ज्ञानेश्वर जाधवर व पुस्तकविश्वचे श्री. नवनाथ जगताप यांनी बालसाहित्यातील महत्त्व, वाचन संस्कृतीचे भवितव्य, आणि सृजनात्मकतेची जडणघडण या विषयांवर मनोगत व्यक्त केले.

दुसऱ्या सत्रात डॉ. संगीता बर्वे व संजय वाघ यांनी बालसाहित्य भाषाशैली आणि कथा-कवितांच्या माध्यमातून भावनिक व बौद्धिक विकास यावर प्रकाश टाकला. बालसाहित्य हे केवळ लहानग्यांसाठी नसून, समाजातील प्रत्येक घटकाने त्यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असा संदेश त्यांनी दिला.

शिक्षण आणि करमणूक यांचा सुरेख मेळ साधत, दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी विविध गेम्स आयोजित करण्यात आले. साहित्याच्या आणि ज्ञानाच्या समृद्धतेसह आनंदाचा एक अविभाज्य भाग म्हणून या खेळांनी बालकांमध्ये सहकार्य, सर्जनशीलता आणि स्पर्धात्मकता या गुणांना चालना दिली.

संध्याकाळच्या सत्रात नृत्य व समूह नृत्य स्पर्धा रंगल्या या स्पर्धेने रंगतदार समारंभाला आणखी चैतन्य मिळाले. साहित्य आणि संस्कृतीच्या संगमातून नव्या उर्जेचा प्रवाह या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला.

बालकांच्या सृजनशीलतेला चालना देणाऱ्या या स्पर्धेत अनेक गटांनी सहभाग घेतला. पारंपरिक लोकनृत्य, चित्रकला, भारतीय शास्त्रीय नृत्य, तसेच विविध प्रकारातील नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली.

रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता या संमेलनाचा समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला. तत्पूर्वी वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. बक्षीस वितरणासाठी प्रमुख अतिथी म्हणून शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट चे सचिव डॉ. गिरीश देसाई, इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, गटशिक्षणाधिकारी अजिक्य खरात उपस्थित होते. यावेळी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. त्याच बरोबर संस्थेमध्ये घेण्यात आलेल्या उन्मेष कौशल्य महोत्सवाची प्रमाणपत्रेही वाटण्यात आली. तसेच उत्तुंग यश मिळवणाऱ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महादेव चव्हाण, भारत बोराटे, हमीदभाई आत्तार, जय इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिग च्या लता नायकुडे,मिनल रंजनकर, सई रंजनकर,अश्विनी गारटकर, जमीर शेख, ना. रा. प्रशालेच्या मुख्याध्यापक सुप्रिया आगरखेड,प्रियांका राखुंडे, सारंगी कुंभार, केदार वाघमारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार रंजनकर यांनी तर आभार प्रदर्शन अरविंद गारटकर यांनी केले. सदर सर्व संमेलन उत्कृष्ठ रित्या पार पपाडण्यासाठी संस्थेचे इन्चार्ज दिपक जगताप. पी. आर. ओ. सागर कांबळे, अमोल राउत, त्रिशला पाटील, केदार गोसावी, भारत माने यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here