विजय शिंदे
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक व पळसदेव येथील प्रगतशील शेतकरी भूषण प्रकाश काळे यांनी आपल्या शेतातून एकरी ११० टन ऊसाचे उत्पन्न घेत उच्चांक गाठला आहे.
जनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बहुसंख्य शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणुन ऊसाची शेती कडे पाहिले जाते.राजकारण समाजकारणा सोबतच व्यवसाय व शेती याकडेही भूषण काळे यांचे विशेष लक्ष असते, गतवर्षी पूर्व हंगामात लागवड केलेल्या आपल्या पाच एकर क्षेत्रात काळे यांनी ८६०३२ या वाणाच्या लागवडीतून भरघोस उत्पादन मिळवले आहे.
याबाबत माहिती देताना भूषण काळे म्हणाले की सेंद्रीय खतांचा वापर पिकाची निगराणी व रासायनिक खते औषधांची योग्य वेळी मात्रा दिल्याने ऊसाची वाढ सुमारे ५० ते ५६ कांड्यांपर्यंत झाली आहे. उजनीच्या पाण्यावर वारंवार एकच पिक घेवून जमिनीचा पोत खराब करण्याचे काम शेतकरी करत आहेत. वास्तविक पिकांची गरज ओळखून शेतकऱ्यांनी खते-औषधांची योग्य मात्रा देणे गरजेचे आहे.
जमिनीची मशागत व पिकाची देखभाल शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देते. लागवडीपासून ते ऊस तोडणी येईपर्यंत एकरी सुमारे साठ हजार रूपये इतका खर्च केला आहे. योग्य वेळी केलेली मशागतीची कामे आणि तणनाशकांची फवारणी करून उस पिकाचे संगोपन केल्यास निश्चितपणे व खात्रीशीर उत्पादन मिळवता येऊ शकते.
यावेळी बोलताना कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि वेळच्या वेळी सुयोग्य पद्धतीने मशागत करून भूषण काळे यांनी एकरी ११० टन ऊस उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.
साखर कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने काळे यांचे त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी भूषण काळे, शेतकी अधिकारी किशोर हिंगमिरे, संजय बांडे, बापू बांडे, चंद्रकांत बांडे, अमोल बांडे, जनार्दन गावडे आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते.