विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील 100 छोट्या व्यावसायिकांना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी तीन लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. अल्पसंख्याकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि. 22) कर्ज मंजुरी पत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुस्ताक अंतुले, डॉ. शशिकांत तरंगे, हनुमंत कोकाटे,सचिन सपकाळ, अमोल पाटील, अतुल झगडे, शुभम निंबाळकर, रियाज शेख, अजीज मुलाणी, शब्बीर काझी, फिरोज पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, माझ्या गोरगरीब मुस्लिम बांधवांना आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांची माहिती मिळावी यासाठी हा कार्यक्रम घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस व महायुती सरकार अल्पसंख्याक समाजासोबत आहे.
मुस्लिम समाजातील येणारी पिढी शिक्षणाकडे वळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. हिंदू – मुस्लिम भाई-भाई आहेत, हीच भावना वाढीस लागावी म्हणून आपण इंदापूर येथील मालोजीराजे गढीसोबतच चांदवली बाबा दर्गाहचे काम मंजूर केले आहे.