निरा- भिमा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आत्मा असून त्या ठिकाणी शेतकरी हिताचे निर्णय घेणारे प्रतिनिधी असावेत, नुसताच विरोधासाठी विरोध नको. कारखाना शेतकऱ्यांसाठी टिकला पाहिजे या उद्देशाने इंदापूर तालुका परिवर्तन विकास आघाडी तटस्थ राहणार असून या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसल्याचे परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख मयूरसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
इंदापूर तालुक्यातील निरा- भिमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून आज (२४ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
निवडणुकी संदर्भात परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख मयूरसिंह पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले इतर स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकीत आमची भूमिका ही लढण्याची असेल परंतु कारखान्यासंदर्भात आधीच अडचणीत असलेल्या संस्थेला निवडणुकीतून अडचणीत आणण्याचे काम आमच्या हातून होणार नाही.त्यामुळे परिवर्तन विकास आघाडी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणार असून कोणालाही पाठिंबा व कोणाला ही विरोध करणार नाही.
विधानसभा निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीची भूमिका ठरली महत्त्वाची..!!
नुकत्याच झालेल्या इंदापूर विधानसभा निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सोनाई परिवाराचे संचालक प्रवीण माने यांनी ४० हजाराच्या आसपास मतदान घेतले, त्यांनी घेतलेल्या निर्णायक मतामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला असल्याचे बोलले जाते.