विजय शिंदे
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नैतिकतेचे धडे दिल्यावर तसेच राजीनामा मागून मागून विरोधकांच्या तोंडाला फेस आल्यावर आणि त्यांचा घसा कोरडा झाल्यावरही मंत्री धनंजय मुंडे यांनी गेंड्याची कातडी पांघरली होती.परंतु देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून मारेकऱ्यांनी सरपंचांना किती अमानुष पद्धतीने मारले, यासंबंधीची छायाचित्रे समोर आल्यानंतर आणि मित्रपक्षांतूनही राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर अखेर नैतिकता खुंटीला टांगलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी देशमुख यांचे निर्वस्त्र फोटो आणि अंगावरील असंख्य व्रण महाराष्ट्राला पाहावे लागले.
गेल्या दोन महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. पण आवादा खंडणी प्रकरण आणि देशमुख हत्या प्रकरणाशी दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे धनंजय मुंडे सांगत राहिले. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभीच्या दिवशीच देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे भयानक रौद्ररूप महाराष्ट्रासमोर आले. ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हालत नाही त्या वाल्मिक कराड याचा सहभाग खंडणी आणि हत्येत असल्याचे खुद्द गुन्हे अन्वेषण विभागानेच दोषारोपपत्रातून न्यायालयाला सांगितल्याने नाईलाजास्तव का होईना पण धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
मारेकऱ्यांनी गाठलेल्या क्रौर्याची सीमा सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्यानंतर कुणाचेही रक्त खवळेल. हेच सगळे फोटो पाहून सत्तापक्षातील नेते आणि विरोधकही अस्वस्थ होते. त्यामुळे सगळीकडूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव होता.युतीतील मित्रपक्षांनीही राजीनाम्याचा सूर लावल्याने धनंजय मुंडे यांच्यापुढे कोणताही पर्याय उरला नव्हता. निकटवर्तीय वाल्मिक कराडनेच खंडणी आणि हत्येचे षडयंत्र रचल्याचे पोलीस चौकशीत निश्चित झाल्यावर धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात रात्री बैठक
देशमुख यांच्या मारेकऱ्यांचे फोटो आणि त्यांची क्रूरता राज्यासमोर आल्यानंतर सगळीकडे संतापाची लाट होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या शासकीय बंगल्यावर जाऊन भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस हे ८ वाजून ५० मिनिटांनी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्या ठिकाणी आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे होते. जवळपास सव्वा-दीड तासाच्या चर्चेनंतर फडणवीस १० वाजून २० मिनिटांनी देवगिरी बंगल्यावरून बाहेर आले. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरच चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादी आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना वाचविण्याची भूमिका घेतली होती
विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील एक गट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करीत असताना राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली. जोपर्यंत पोलीस चौकशीत काही निष्पन्न होत नाही तोवर राजीनामा घेणार नाही, असे ते निक्षून सांगत राहिले. राजीनामा देण्याची परंपरा वगैरे झूठ आहे, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा कितीदा प्रयत्न केला. पक्षाचा अध्यक्ष आरोप होत असलेल्या मंत्र्याचा बचाव करतो आहे, हे पाहून पक्षातील इतर आमदार, मंत्री, नेतेही धनंजय मुंडे यांच्या बचावासाठी पुढे सरसावले.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील सख्य सगळ्या महाराष्ट्राला माहिती होते. जिथे धनंजय मुंडे तिथे वाल्मिक कराड, असे चित्र गेली अनेक वर्षे महाराष्ट्राने पाहिले होते. वाल्मिक कराड हा एवढा मोठा झाला होता की धनंजय मुंडे जरी पालकमंत्री असले तरी प्रति पालकमंत्री म्हणून तो बीडमध्ये काम पाहत होता. जिल्हाधिकाऱ्यांनी बदली असो, जिल्हा पोलीस अधिक्षकांची नियुक्ती असो शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कामे असो, वाल्मिक कराडच्या एका फोनवर सगळी प्रकरणे मार्गी लागायची. वाल्मिक कराडवर देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा खंडणीचे आरोप झाल्यानंतर आपला काहीही संबंध नाही, असे भासविण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला. तसेच पोलीस चौकशीतून काही गोष्टी समोर येत नाहीत, तोवर राजीनामा देणार नाही, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली.
पैशाच्या हव्यासापोटी आणि खोट्या प्रतिष्ठेपायी तसेच राजकीय आणि सामाजिक दहशत पसरविण्याचा उद्देशाने वाल्मिकने त्याच्या टोळीतल्या पोरांना आदेश दिला. मंत्र्याच्या जवळचा माणूस आहे, खाकी आपल्यासाठीच काम करते, असे त्याला वाटत होते. पण कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कानून के हात लंबे होते है… ही फिल्मी वाक्य वाल्मिकला आज पटली असतील आणि कदाचित धनंजय मुंडेंनाही…!