विजय शिंदे
देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ भाजपने प्रतिष्ठेचा केला आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे चौथ्यांदा मैदानात उतरल्या असून त्यांच्या प्रचारासाठी दि.२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सभा आयोजित केली असून या सभेला ५० हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) तेजसिंह पाटील व कार्याध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना महारुद्र पाटील म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटी नंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे नेते शरद पवार हे इंदापूर मध्ये जाहीर सभेच्या निमित्ताने येत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. संजय जगताप व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
लोकांमध्ये पवार साहेबांना प्रचंड सहानभूती असून लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चिड निर्माण झाली आहे. या चिडीचे रूपांतर भविष्यात बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित आहे.मात्र, इंदापूर तालुक्यात गेल्या वेळी पेक्षा जास्त मताधिक्य मिळवणे हेच आमचे ध्येय आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष तेजसिंह पाटील म्हणाले शरद पवार एक चालते बोलते विद्यापीठ आहे या विद्यापीठात हजारो विद्यार्थी येतात आणि जातात नवीन विद्यार्थी तयार करण्याचे हे विद्यापीठ असल्याने कोण सोडून गेले कोण सोबत आहे हे बघायची कोणतीही गरज नाही. भविष्यात इंदापूर तालुका हा शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी ठाम राहील. अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील पवार साहेबांच्या कट्टर समर्थक व स्वाभिमानी मतदार कोणाच्याही दबावाला बळी पडले नाहीत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सुज्ञ मतदार येणाऱ्या २३ तारखेला पवार साहेबांचे विचार ऐकण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ नेते अशोक घोगरे, राज्यसदस्य अमोल भिसे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, काँग्रेस पक्षाचे निवास शेळके,विकास खिलारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.