विजय शिंदे
शिक्षक हा समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा घटक आहे. तो विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच देत नाही, तर त्यांचे चारित्र्य, विचारसरणी आणि जीवनदृष्टी घडवतो. त्यामुळे शिक्षकांना सन्मान मिळायला हवा, त्यांचे हक्क अबाधित राहायला हवेत. मात्र, आजच्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांना केवळ एक कर्मचारी म्हणून पाहिले जाते. त्यांच्या वेतन, बढती, आर्थिक लाभ, कर्ज प्रकरणे, वैद्यकीय देयके अशा अनेक गोष्टींवर संस्थाचालक आणि मुख्याध्यापक नियंत्रण ठेवतात. याचा परिणाम असा होतो की शिक्षकांना त्यांच्या हक्कांसाठी विनाकारण झगडावे लागते, अनेकदा आर्थिक पिळवणुकीला सामोरे जावे लागते आणि त्यांच्या आत्मसन्मानावर गदा येते.
मुख्याध्यापक हा शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा असतो. त्याची भूमिका फक्त शाळेचे प्रशासन सांभाळण्यापुरती मर्यादित नाही. तर, शिक्षकांच्या अडचणी सोडवणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हीदेखील त्याची जबाबदारी असते. मुख्याध्यापकाने आपणही एकेकाळी शिक्षक होतो याची जाणीव ठेवायला हवी. शिक्षकांची वेतनश्रेणी, पदोन्नती, निवड श्रेणी, वैद्यकीय बिलांचे मंजुरीकरण अशा अनेक बाबतीत मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका असते. पण दुर्दैवाने काही ठिकाणी मुख्याध्यापक स्वतः शिक्षकांच्या बाजूने उभे न राहता त्यांना संस्थाचालकांच्या दडपशाहीला सामोरे जाण्यास भाग पाडतात.
शिक्षकांना त्यांच्या हक्कांचे लाभ मिळवण्यासाठी संस्थाचालकांची भेट घ्यावी लागते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. वेतन प्रमाणपत्र देणे, कर्ज हमीपत्र देणे, वैद्यकीय देयके मंजूर करणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी असताना अनेकदा शिक्षकांना विनाकारण संस्थाचालकांकडे धाडले जाते. यामागे एक प्रकारची अनधिकृत व्यवस्था निर्माण केली जाते, जिथे शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी आर्थिक देवाणघेवाण करावी लागते. हे फक्त आर्थिक शोषण नसून, शिक्षकांच्या आत्मसन्मानावरच घाला आहे. काही मुख्याध्यापक तर संस्थाचालकांच्या सांगण्यावरून वर्गणी गोळा करणे, जबरदस्तीने निधी उभारणीसाठी शिक्षकांकडून पैसे मागणे असे प्रकार करतात.शिक्षकांनी याला विरोध केल्यास त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जातो. काही ठिकाणी अशा शिक्षकांना हेतुपुरस्सर त्रास दिला जातो, अधिक कामाचा ताण दिला जातो, त्यांच्या लहानशा चुका मुद्दाम मोठ्या केल्या जातात आणि त्यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवल्या जातात. यामुळे शिक्षक हतबल होतात आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. ज्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यायचा तोच जर व्यवस्थेच्या दबावाखाली स्वतः आत्मविश्वास गमावत असेल, तर शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकसान आहे.
समाजात अनेकदा शिक्षकांवर टीका केली जाते, त्यांच्याकडून दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा केली जाते. मात्र, त्यांना कुठल्या परिस्थितीत काम करावे लागते, त्यांच्यावर कोणते अन्याय होतात, याचा विचार समाज करत नाही. शिक्षक जर मानसिक तणावात असेल, सतत व्यवस्थेच्या दडपशाहीला बळी पडत असेल, तर तो विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण कसे देईल? म्हणूनच समाजाने फक्त शिक्षकांकडून अपेक्षा न ठेवता, शिक्षकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. आर्थिक शोषण करणाऱ्या संस्था आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात समाजाने आवाज उठवला पाहिजे.
अर्थात, सर्वच मुख्याध्यापक अशा प्रकारे वागत नाहीत. अनेक मुख्याध्यापक अतिशय सक्षमपणे शाळेचा विकास करतात, शिक्षकांना न्याय मिळवून देतात आणि व्यवस्थेच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करतात. असे मुख्याध्यापक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात, त्यांच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबतीत तातडीने मदत करतात आणि संस्थाचालकांकडून होणाऱ्या अडथळ्यांना धैर्याने सामोरे जातात. त्यामुळे शिक्षकांना योग्य वातावरण मिळते, ते मनःपूर्वक अध्यापन करतात आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होतो.
मुख्याध्यापकांनी व्यवस्थेचे हस्तक न बनता, शिक्षकांना न्याय मिळवून देणारे खरे मार्गदर्शक व्हायला हवे. संस्थाचालकांनी शिक्षकांकडून आर्थिक फायदा मिळवण्याच्या वृत्तीला आळा घालायला हवा. आपल्या शिक्षक भारती संघटनेनेही अशा अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. समाजानेही या शोषणाविरोधात जागरूक होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी जर निडरपणे अन्यायाला विरोध केला, संघटित राहिले आणि कायदेशीर मार्गाने आपले हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला, तर शिक्षण व्यवस्थेतील ही गंभीर समस्या दूर होऊ शकते.
शिक्षण ही केवळ संस्था चालवण्याचा व्यवसाय नसून, ते समाजाच्या भविष्याशी जोडलेले आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतील मूल्यांची घसरण रोखायची असेल, तर शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना आत्मसन्मानाने काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि समाज या सगळ्यांनीच एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रातील हे विघातक घटक दूर केले, तरच आपण शिक्षण क्षेत्राला पुन्हा सन्मान मिळवून देऊ शकतो.
विजयकुमार गुंड
(जिल्हा प्रवक्ते)
शिक्षक भारती सोलापूर
8788021891