विजय शिंदे
मनुष्य जीवनात प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी, त्यातून सर्वात मोठे पुण्य मिळते. खऱ्या अर्थाने यातच सर्वात मोठा परमार्थ आहे, जो आई-वडिलांची सेवा करतो त्याची देवसुद्धा दखल घेतो, असे प्रतिपादन कीर्तनकार सागर महाराज बोराटे यांनी केले. इंदापूर तालुक्यातील अभंग वस्ती येथे कैलासवासी जगन्नाथ मल्हारी यादव यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते.
यावेळी सागर बोराटे महाराज म्हणाले, मायबाप शेतकऱ्यांनी जीवनात येणाऱ्या संकटाला कधीच घाबरू नये, थोडे दिवस कळ सहन करा येणारा काळ हा तुमचाच आहे. पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे.
मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांची नित्यनियमाने दर्शन घेऊन भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. कीर्तन सोहळ्यात येऊन हरिनाम जप केला पाहिजे, वाईट संगतीचे पाप खूप मोठे आहे, म्हणून चांगल्या व्यक्तिच्या संगतीत राहा, संपत्ती कमावण्यापेक्षा संतती संस्कारित करा. त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा घडो अशी सदिच्छाही त्यांनी या वेळी दिली.
यावेळी देविदास जगन्नाथ यादव, शिवाजी जगन्नाथ यादव. नातू निलेश मारुती यादव,मुली शकुंतला जगन्नाथ नाळे, गजाबाई नरसु नाळे व कुटुंबीय उपस्थित होते.