विजय शिंदे
दिल्लीत शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केले पण मोदी सरकार त्यांच्याकडे पाहायलाही तयार नाही. काँग्रेसचे बँक खाते सुद्धा या लोकांनी गोठवले. व्यवहार बंद केले.उद्या तुमचेही खाते ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. यासाठी या लोकांचा पराभव करा. यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर घणाघात केला. ते इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
या वेळी मोदी सरकारवर निशाणा साधताना शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढले आहे. हे घालवायचे असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे. आज २०२४ वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही.
इंदापुरकरांना आवाहन करताना शरद पवार म्हणाले, या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती ९८ टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचे नाव देशात दोन नंबरला आहे. काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आज आपले चिन्ह बदलले, तुतारी लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा.
शरद पवार म्हणाले, केंद्राने साखर निर्यातीवर कर आणि जीएसटी लावला. यामुळे आज कारखान्यात साखरेची पोती पडून आहेत. यावर तोडगा म्हणून प्रधानमंत्र्यांनी इथेनॉल करायला सांगितले. कारखान्यांनी तयारही केले, नंतर मात्र बंधन घातले. याचा मोठा फटका कारखान्यांना बसला. यावरून दिसते की यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आता चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला करा.
शरद पवार म्हणाले, सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहे. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला.
आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनी लोकांसाठी अनेक चांगली कामे केली.
आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत, कशासाठी तर पंतप्रधानांवर टीका केली म्हणून.
सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. आज संकटाचे चित्र देशात आहे. हे चित्र बदलायचे आहे. यासाठी विरोधकांची एकजूट महत्वाची आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या इंदापूर येथील शेतकरी मेळाव्याला शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार, शर्मिला पवार, बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय सचिव राहुल मखरे,तेजसिह पाटील, महारुद्र पाटील,अमोल भिसे,अशोक घोगरे,छाया पडसळकर, सागर मिसाळ,नितीन शिंदे,काका देवकर,अरबाज शेख, शहराध्यक्ष निहायत काजी, आशुतोष भोसले,दादासाहेब थोरात,निवास शेळके, संजय शिंदे तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.