त्रिभुवन सहकारी विद्यापीठ स्थापनेचा निर्णय ऐतिहासिक, दूरगामी- अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मानले आभार .

विजय शिंदे 

नवी दिल्ली : त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा ऐतिहासिक, दूरगामी,नव्या युगाची सुरूवात करणारा आणि सहकारी क्षेत्राला बळकटी देणारा असून ही दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दाखविल्या बद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली असून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.

या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जाचे शिक्षण, मूलभूत संशोधनाच्या संधी निर्माण होतील आणि त्याने सहकार क्षेत्राला बळकटी मिळेल अशी भावना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केली आहे.

“त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा भारतातील सहकारी चळवळीसाठी नव्या युगाची सुरुवात आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने एक परिवर्तनकारी पाऊल उचलले आहे त्याने सहकारी क्षेत्राचे भविष्य घडेल. हे विद्यापीठ ज्ञान केंद्र म्हणून काम करेल, व्यावसायिकांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्याने सहकारी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज करेल.” अशा शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सहकारी साखर उद्योगाची पाळेमुळे सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण विकासाशी खोलवर जोडली आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करतो,असेही हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी भारत सरकारच्या या उपक्रमाचे स्वागत करताना “त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या स्थापनेच्या निर्णयाने कौशल्यातील कमतरता दूर करण्यास चालना मिळेल, विशेष सहकारी अभ्यासक्रम सुरू करण्यास आणि देशभरातील 284 हून अधिक प्रशिक्षण संस्थांना बळकटी देण्यास मदत करेल आणि भारताच्या आर्थिक विकासात सहकारी क्षेत्राचे कार्य आधारस्तंभ म्हणून अबाधित राहील ” या शब्दात आपला विश्वास व्यक्त केला आहे.

भारत सरकारच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त करत असतानाच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने सहकार क्षेत्र मजबूत करण्यास आपण कटिबद्ध आहोत आणि परिवर्तनाच्या या चळवळीत आपण सक्रीय राहू अशी ग्वाही दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here