विजय शिंदे
बुद्धिमत्ता, जिद्द आणि कल्पकतेच्या संगमाला सामाजिक भानाची जोड देऊन उत्तुंग काम करणारे युवाजन भविष्यातील पिढीसाठी प्रकाशवाटा निर्माण करत आहेत. या युवा गुणीजणांना कौतुकाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा आज सोमवारी होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांत भरीव योगदान देऊन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या २० ‘तरुण तेजांकितां’ना मुंबईतील कार्यक्रमात गौरविण्यात येईल.
यंदा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे सातवे वर्ष असून आजवर देशभरातील १०० हून अधिक प्रज्ञावंत युवा मंडळींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि राज्याबाहेरूनही आलेल्या शेकडो प्रज्ञावंतांच्या अर्जांची परीक्षक मंडळाद्वारे काटेकोरपणे छाननी करण्यात आली. युवा प्रज्ञावंतांच्या कार्याची व्याप्ती आणि वैविध्य लक्षात घेत त्यातून मोजक्या विजेत्यांची निवड करण्याचे आव्हान परीक्षक मंडळाने पेलले. युवकांनी घालून दिलेले आदर्श, निर्माण केलेले मानदंड, समाजावर आणि परिस्थितीवर कार्याचा होणारा परिणाम, संकल्पनेतील नावीन्य अशा अनेक पैलूंवर परीक्षकांनी चर्चा केली. त्याचबरोबर अर्जदारांनी दिलेल्या माहितीची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी करून कला व मनोरंजन, उद्याोग, व्यवसाय, समाजसेवा, कायदा व प्रशासन, विज्ञान व संशोधन, क्रीडा अशा विविध विभागांमध्ये तेजांकितांचा शोध घेण्यात आला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’च्या परीक्षक समितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, राज्याच्या उद्याोग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे यांचा समावेश होता. ‘तरुण तेजांकितां’चा हा सन्मान सोहळा आज, सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार आहे. हा सोहळा केवळ निमंत्रितांसाठी आहे.
अभिजीत खांडकेकर निवेदकाच्या भूमिकेत..
विविध क्षेत्रांमध्ये लखलखते यश संपादन करणाऱ्या युवांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा यंदा प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे. मालिका-चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत घराघरांत पोहोचलेला अभिजीत त्याच्या ओघवत्या शैलीत सोहळ्याचे सूत्रसंचालन करेल.