विजय शिंदे
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हँनिमन जीवन गौरव पुरस्कार सन २०२५ – २६ हा इंदापूर ( जिल्हा पुणे ) येथील डॉ. संदेश शरद शहा यांना घोषित झाला आहे. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
डॉ. संदेश शहा यांनी इंदापूर शहर तसेच पंचक्रोशीत होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी १०० हून जास्त मोफत होमिओपॅथिक शिबिरे घेऊन ५० हजार हून जास्त रुग्णांना एक महिन्याची औषधे मोफत दिली आहेत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील हजारो वारकऱ्यांना सलग तीस वर्ष त्यांनी मोफत होमिओपॅथिक औषधदान केले आहे. ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ११ हून जास्त चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले आहे. कोरोना महामारीत बेड न मिळालेल्या २२० रुग्णांना त्यांच्याच घरी विलगीकरण करून त्यांनी या औषधांचा वापर करून त्यांना बरे केले आहे. एड्स झाल्यानंतर मनुष्य केवळ ५ वर्ष जगतो असा सन १९९५ च्या दशकात प्रचार सुरू असताना त्यांनी अनेक रुग्णांचे आयुष्य होमिओपॅथिक औषध देऊन वाढविले आहे. हजारो रुग्णांची त्यांनी मूतखडा या आजारातून मुक्तता केली असून हजारो रुग्णांच्या विविध आजारांच्या शस्त्रक्रिया त्यांनी टाळल्या आहेत.
होमिओपॅथी बरोबरच योग, शाकाहार, शेती, रक्तदान, पत्रकारिता तसेच व्यसनमुक्ती साठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या इंदापूर तालुक्यातील गोखळी, तरंगवाडी, विठ्ठलवाडी येथे ओढा खोलीकरण व रुंदीकरण करून या गावांची तीव्र पाणी टंचाई दूर करण्यास मदत केली आहे. त्यांनी १२०० शेतकऱ्यांना मोफत गट शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. २२०० युवा पिढीस त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. विठ्ठलवाडी येथील ओढा खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष संदेश शहा यांचा सामाजिक डॉक्टर म्हणून आवर्जून उल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
पुरस्कार वितरण जून महिन्यात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.
दरम्यान राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, डॉ. संदेश शहा यांना हा पुरस्कार घोषित झाल्याने इंदापूर तालुक्याचा मानसन्मान उंचावला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळणारे डॉ. संदेश शहा हे तालुक्यातील एकमेव डॉक्टर असून त्यांच्या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
यासंदर्भात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात डॉ. संदेश शहा यांच्या मोफत होमिओपॅथिक शिबिराचा मी उद्घाटक म्हणून साक्षीदार आहे. डॉ. बाहुबली शहा तसेच इतर १० ते १५ डॉक्टरांचे शिबिरासाठी डॉ. संदेश शहा यांना सहकार्य होत होते. संपूर्ण राज्यात मंत्री म्हणून काम करत असताना अनेक ठिकाणी डॉ. संदेश शहा यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख होत होता. त्यांना घोषित झालेल्या या पुरस्काराचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
दरम्यान राज्य लेखा समितीचे माजी अध्यक्ष, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, मावळत्या नगराध्यक्षा अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूल चे विश्वस्त मुकुंद शहा, जेष्ठ कवयित्री, साहित्यिक प्रतिभा गारटकर, तुषार रंजनकर, वसंतराव मालुंजकर आदींनी डॉ. संदेश शहा यांचे अभिनंदन केले आहे.