विजय शिंदे
इंदापूर तालुका शांत विचाराने एकत्रितपणे समाजकारण करणारा तालुका आहे, ५६ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा विधानसभेत गेलो, माझ्या आधी दहा वर्षांपूर्वी (१९५२)शंकरराव पाटील इंदापूर मधून निवडून येत होते, सत्ता कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही ही गोष्ट इंदापूरने शिकवली. शंकराव पाटील यांनी राजकारण केले ते कधी हवेत राहिले नाहीत सत्ता कधी डोक्यात गेली नाही नम्रता कधी सोडली नाही, स्वच्छ कारभार कधी सोडला नाही त्यामुळे येथे येणाऱ्या सर्वांना त्यांचे स्मरण होत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वर्गीय शंकराव पाटील यांची इंदापुरात काढलेली आठवण चांगली चर्चेचा विषय झाली. यामुळे पाटील समर्थकांना साद घालण्याचा प्रयत्न झाला असल्याचे बोलले जात आहे.
काय आहे पवार-पाटील संघर्ष..
लोकसभेला मदत करून सुद्धा पवारांनी मला फसवलं , असा आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील गोटात दाखल झाले खरे, परंतू इंदापूर तालुक्यात पाटील-पवार संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास आहे. आठव्या आणि अकराव्या लोकसभेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे चुलते शंकराव पाटील आणि शरद पवार यांच्यात थेट लढत झाली होती. या दोन्ही लढतीत पवार विजयी झाले होते. इंदापूर विधानसभा मतदार संघ राष्ट्रीय काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. बारामती तालुक्याच्या जवळचा मतदार संघ म्हणून या तालुक्यातील मतदारांवर पवार घराण्याचा प्रभाव आहे. समाजवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर १९८४ साली शरद पवार यांनी काँग्रेसच्या शंकरराव पाटील यांचा पराभव केला होता. मात्र १९८५ साली शरद पवार यांनी लोकसभा सदस्यात्वाचा राजिनामा दिल्याने पोटनिवडणुक झाली. यावेळी काँग्रेसकडून शंकरराव पाटील तर जनता पक्षाच्या वतीने संभाजीराव काकडे यांनी निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत देखील पवार-पाटील घराण्यात सुप्त संघर्ष दिसून आला होता. जनता पक्षाच्या संभाजीराव काकडे यांनी शंकरराव पाटील यांचा पराभव केला. या निडणुकीत शरद पवार यांनी शंकरराव पाटील यांच्या विरोधात काकडे यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. दरम्यान १९८९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी काँग्रेस (आय) पक्षात प्रवेश झाला. या लोकसभेसाठी काँग्रेसकडून पुन्हा शंकरराव पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांनी भाजपच्या संभाजीराव काकडेयांचा पराभव केला. यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९१ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुतने अजित पवार यांच्यासाठी राजकिय खेळी खेळली. विद्यमान खासदार शंकरराव पाटील यांना डावलून अजित पवार यांच्यासाठी काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यात शरद पवार यशस्वी झाले. अजित पवार यांनी ही निवडणुक जिंकली. त्यानंतर १९९६ साली लोकसभेसाठी पुन्हा एकदा काँग्रेसकडून शरद पवार, तर काँग्रेसने डावलल्यामुळे अपक्ष म्हणून शंकरराव पाटील यांनी पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकला. पवार यांनी अपक्ष उमेदवार शंकरराव पाटील यांच्या विरोधात ४ लाख २७ हजार ५५९ मते मिळवली, आणि विजयी झाले.यानंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये इंदापूरमधून सलग चार वेळा हर्षवर्धन पाटील आमदार झाले. पवार-पाटील घराण्याती संघर्ष कमी करत २०१४ चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सांगता सभा घेतल्या. मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवारआणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्षाची धग कायम राहिली आहे.