विजय शिंदे
गेले वीस वर्षे इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दशरथ माने, आप्पासाहेब जगदाळे, अविनाश घोलप या नावाभोवती राजकारण फिरत होते.काळाच्या ओघात अनेक सत्तांतरे झाली विधानसभेसाठी वरीलपैकी अनेकांची नावे चर्चेत आली यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात १९९५-१९९९-२००४ सलग तीन निवडणुका लढवत प्रदीप गारटकर यांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवले. परंतु त्यांची आमदार होण्याची इच्छा मात्र अजूनही पूर्ण झाली नाही. इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले गारटकर यांनी पक्ष संघटनेतील अनेक पदे भूषवली आता सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत परंतु त्यांना विधान परिषद किंवा एखादे मोठे महामंडळ मिळावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची होती एक कुशल संघटक अशी त्याची ओळख आहे.
तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाराज होत दशरथ माने यांनी त्यांची साथ सोडली २००४ साली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व दशरथ माने अशी लढत होण्याची शक्यता होती परंतु माने यांनी शिवसेनेच्या प्रदीप गारटकर यांना पाठिंबा दिल्याने त्यांची ती संधी हुकली नंतर त्यांना कधीही संधी मिळाली नाही.
२००९ साली दूधगंगा दूध उत्पादक संघाचा चेअरमन पदाचा राजीनामा देत पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांनी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घरोबा केला व अपक्ष उमेदवार दत्तात्रय भरणे यांना मदत केली त्यावेळी २०१४-२०१९ साली अप्पासाहेब जगदाळे यांना संधी देऊ असे ठरले असल्याची चर्चा नेहमी होत असते परंतु जगदाळे यांना संधी न मिळाल्याने त्यांनी २०१९ साली भाजपचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जवळीक साधली परंतु अनेक दिवसांपासून पाटील व जगदाळे यांच्यामध्येही पटत नसल्याचे बोलले जाते.
इंदापूर तालुक्यात विधानसभेसाठी आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना तिसरा पर्याय म्हणून माने,गारटकर व जगदाळे यांच्याकडे पाहिले जात होते परंतु सध्याची राज्याची राजकीय परिस्थिती पाहता इंदापूरचे राजकारण हे अस्थिर बनले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रवीण माने यांनी शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले होते. विविध कार्यक्रमात त्यांनी सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले परंतु शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याकडे त्यांनी पाठ फिरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून प्रवीण माने हे राजकारणापासून वेगळे होतात की काय.? अशी शंका निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून विधानसभेचे उमेदवार म्हणून प्रवीण माने यांच्याकडे पाहिले जात होते.आगामी काळात भरणे-पाटील व माने अशी लढत होण्याची शक्यता होती. प्रवीण माने हे इंदापूर तालुक्यातील तिसरा पर्याय देतील अशी शक्यता निर्माण झाली परंतु माने यांच्या भूमिकेमुळे इंदापुरात आता तिसरा पर्याय दिसेनासा झाला आहे. आगामी काळात पाटील व भरणे हेच इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पर्याय असल्याचे बोलले जात आहे.