निवडणुकीच्या तोंडावर का होईना काळजी वाटली, हेही नसे थोडके. भाजपच्या अंकिता पाटील- ठाकरे यांची खा सुप्रिया सुळेंवर टीका

इंदापूर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड, पुरंदर, इंदापूर आणि बारामती या भागातील पाणी प्रश्न गंभीर होत आहे.या भागातील पाणी प्रश्नावर गांभीर्यानं विचार करावा, अशी मागणी केली आणि यावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

सुप्रिया सुळेंनी केलेल्या मागणीवरुन इंदारपूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटलांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. तीन टर्म सत्तेत असताना पाणी प्रश्न आठवला नाही त्यात जुन- जुलै महिन्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी प्रश्न का मांडला नाही. विरोधीपक्षात गेल्यावर पाणी प्रश्न आठवला का?, अशा शब्दांत अंकिता पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

अंकीता पाटील बोलताना म्हणाल्या की, सुप्रिया सुळे या तीन टर्म बारामतीत खासदार आहेत. बारामती परिसरातील पाणी प्रश्न हा आजचा नसून अनेक वर्षांपासूनचा आहे. त्यासोबतच लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पाणी प्रश्नांवर उत्तरं द्यायची की विरोधी पक्षात असल्याने प्रश्न विचारायचे. लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला हवीत. त्यासोबतच दर महिन्याला जिल्हा नियोजनाच्या बैठका होतात. त्या बैठकांमध्ये जिल्ह्याच्या अनेक समस्या आणि प्रश्नांवर चर्चा केली जाते आणि त्यावर तोडगा काढला जातो. त्या बैठकीत उपस्थित राहणं गरजेचं असतं, मात्र सुप्रिया सुळे उपस्थित नसतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, ताईंना, बारामती लोकसभेबद्दल अधिक काळजी निवडणुकीच्या तोंडावर का होईना वाटली, हेही नसे थोडके.दुष्काळी परिस्थितीचा सामना करायला महायुती सरकार सज्ज आहे. पण बारामतीच्या दुष्काळाची दाहकता तुम्हाला आताच का दिसली? कमी पाऊसचा भाग असला, तरी हा भाग सिंचनापासून वंचित का राहिला? ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? बारामती लोकसभेचं नेतृत्व म्हणून काय केलं? जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना हजर राहीला असतात तर? संसदेत नुसतेच प्रश्न विचारले म्हणून ‘संसदरत्न’ मिळवता, दुष्काळी भागाचे प्रश्न सोडवून कधी मिळवणार?, असे अनेक प्रश्न विचारत त्यांनी सुप्रिया सुळेंवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here