विजय शिंदे
राज्यातील महायुतील जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये कलगितुरा पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू असतानाच माढ्यामध्ये रणजितसिंह निंबाळकरच्या उमेदवारीला भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विरोध पाहायला मिळाला होता.
निंबाळकर यांच्या विरोधात एक गट एकवटल्याचं पहायला मिळालं होतं. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालं असून येत्या चार दिवसात मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश होण्याचे जयसिंह मोहिते पाटील यांनी संकेत दिले आहे.विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असून धैर्यशील मोहिते पाटील पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील उद्या शरद पवारांची भेट घेणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील. माढा , सोलापूर, बारामती मतदारसंघात आमच्या निर्णयाचा परिणाम दिसेल, असं जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं आहे.आम्ही मतदारसंघात चाचपणी करून भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. भाजप वरिष्ठ नेत्यांना समजले पाहिजे खरी ताकत कुठे आहे. भाजपच्या 28 पेक्षा अधिक जागा निवडून येणार नाहीत. सध्या भाजपमध्ये अवाक सुरू आहे, पण भाजप मधून बाहेर पडायची सुरुवात आम्ही करत आहोत. येत्या चार दिवसांत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी कलूज येथील मोहिते पाटील यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही असं मोठं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे उमेदवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी नाकारली. त्यानंतर नाराज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे संकट मोचक समजले जाणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आज अकलूजला आले होते. यावेळी त्यांनी सुमारे दोन तास बंद दाराआड त्यांच्याशी चर्चा झाली होती, मात्र सकारात्मक तोडगा निघाला नव्हता.