विजय शिंदे
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपचे मोठे नेते असून तुम्ही फक्त आमदारकीचे सोडा त्यांच्यावर आमदारकीसह मोठी जबाबदारी लवकरच मिळणार असल्याची खात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूर येथील भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे.
आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी इंदापूर येथील भाजप कार्यकर्त्यांशी मुंबई येथील सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी इंदापूर तालुक्यातील उपस्थित कार्यकर्त्यांनी मित्र पक्षाकडून पालकमंत्री पदाचा गैरवापर करून भाजप पक्षातील अनेक सरपंच व कार्यकर्त्यांना फोडण्यात आले तसेच निधी कमी मिळाला, त्याचबरोबर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले अशा अनेक तक्रारीचा पाढा वाचला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की झाले गेले ते विसरून जा यापुढे तुमच्या बाबतीत असं होणार नाही याची मी खात्री देतो तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर खूप मोठी जबाबदारी दिसेल त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल असून तुम्ही ती काळजी करू नका अशी खात्री मी देतो त्यामुळे तुम्ही कामाला लागा व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी प्रयत्न करा असे फडणवीस म्हणाल्याचे संबंधित कार्यकर्त्यांनी सांगितले.त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांची एक बैठक होणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघात आमदार दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना मानणारी मतदार संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा निश्चितच फायदा इंदापूर तालुक्यात उमेदवार सुनेत्रा पवार यांना होणार आहे.