विजय शिंदे
गेल्या काही दिवसापासून ज्याची राज्याच्या राजकारणात चर्चा होती, त्या बारामतीच्या लढतीसाठी उमेदवारांची घोषणा झाली आहे. महायुतीकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्याची आपण शक्यता आतापर्यंत वर्तवत होतो. ती खरी ठरली असून संपुर्ण देशातून आता बारामतीच्या लढतीकडे लक्ष लागून राहणार आहे.
मागील कित्येक वर्षापासून बारामती लोकसभेवर शरद पवार यांचं वचर्स्व राहिलं आहे. सुरूवातीला बारामती लोकसभेत शरद पवार खासदार झालेत. त्यानंतर १९९१ साली अजित पवार बारामतीतून खासदार होऊन दिल्लीत गेले. परंतु पुन्हा अजित पवार महाराष्ट्रात आले आणि शरद पवार बारामतीतून निवडून गेले. शरद पवार यांच्यानंतर २००९ पासून ते आजतागायत सुप्रिया सुळेंनी बारामतीत विजयी पतका फडकवला आहे.
भाजप गेल्या कित्येक वर्ष बारामतीवर लक्ष ठेऊन आहे. राष्ट्रवादीत फुट पडण्याच्या आधी भाजपने तर ‘मिशन बारामती’ असा संकल्प ठेवला होता. यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. तर राज्यातून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने बारामती दौरा करीत होते. मात्र अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या ताब्यात देऊन सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी व्युहरचना आखण्यास सुरूवात केली.
अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी बारामतीत बंडाचा झेंडा हाती घेतला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची समज काढून शिवतारेंचा बंड थंड केला. दुसऱ्या बाजूला दौंडमध्ये राहुल कुल, इंदापुरमध्ये हर्षवर्धन पाटील पुरंदरमध्ये विजय शिवतारे आणि खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांच्याशी जुने भांडण विसरून फडणवीसांनी सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याच्या सुचना दिल्या. तर भोरमध्ये स्वत : सुनेत्रा पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन अप्रत्यक्षपणे आपणास मदत करण्याचे आवाहन केले.
सुप्रिया सुळे गेल्या तीन टर्म बारामतीत खासदार म्हणून काम करीत आहेत. अजित पवार यांची काम करण्याची पद्धत, संवादवृत्ती, प्रत्येक व्यक्तींसोबत ओळख यामुळे सुप्रिया सुळे यांनी बारामती जड जाणार अशी चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सुळे यांच्यासोबत शरद पवार अजूनही पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळे बारामतीच्या लढत ही अटीतटीची ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षापासून बारामती जिंकण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न केलेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कधी यश आले नाहीत. यावेळी बारामतीचा उमेदवार पवार कुटुंबियातीलच आहे. मागच्या वेळी मावळात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात उभे होते. यावेळी बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार सुळेंच्या विरोधात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील यंदाची सर्वात लक्षवेधक लढत बारामतीत होणार आहे. त्यामुळे बारामती जिंकण्याचं भाजपचं स्वप्न यावेळी अजित पवार पुर्ण करणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.