इंदापूर २४// राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवर यांची गोविंद बागेत भेट घेतली.त्याला काही दिवस होत नाहीत, तोच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी जाचक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेक दिवस राजकीय दृष्ट्या अडचणीत असलेले पृथ्वीराज जाचक यांना मात्र चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळाले..
राज्यात सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. भविष्यात होऊ घातलेल्या नणंद-भावजयीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. बारामतीची राजकीय हवाही चांगलीच तापलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दररोज गाठीभेटी होताना दिसत आहेत. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. या भेटीवेळी जाचक कुटुंबीय आणि नटराजचे अध्यक्ष किरण गुजर उपस्थित होते. ही सदिच्छा भेट होती, असे सांगितले जात असले तरी लोकसभा निवडणुकीतील काँटे की टक्कर पाहता ही भेट महत्वाची आहे.काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज जाचक आणि त्यांच्या मुलाने गोविंद बागेत जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर जाचक यांची सुनेत्रा पवार यांनीही भेट घेतल्याने जाचक हे प्रकाशझोतात आले आहेत. जाचक यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. साखर क्षेत्रातील जाणकार म्हणून पृथ्वीराज जाचक यांना ओळखले जाते.