विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापुरात मोठे फेर बदल होताना दिसून येत आहेत,राष्ट्रवादी काँग्रेसला एक धक्का बसला असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे हे आपल्या समर्थकांसह मंगळवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ४:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.इंदापूर शहरातील श्री वाघ पॅलेस येथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील विरोध कमी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांशी जुळवून घेतले होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आप्पासाहेब जगदाळे व समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा घेतलेला निर्णय यामुळे इंदापूर तालुक्यातील राजकारणात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा आहे.
आप्पासाहेब जगदाळे यांच्यासोबत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन भरत शहा व काही संचालक, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन कांतीलाल झगडे व काही संचालक त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघाचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संचालक, चेअरमन,सरपंच ग्रामपंचायत सदस्य पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.