विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असून महाविकास आघाडी व महायुती यांच्या माध्यमातून भेटीगाठीवर भर दिला जात आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार श्रीनिवास पवार योगेंद्र पवार व शर्मिला पवार इंदापूर तालुक्यात सातत्याने उपस्थित राहत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर महायुतीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,उमेदवार सुनेत्रा पवार लक्ष ठेवून आहेत, दररोज नवनवे डाव प्रति डाव टाकले जात आहेत.
इंदापुरात प्रवीण माने यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांच्याशी घरोबा केला, याच संधीचा फायदा उठवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे व माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी शरद पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूर ची वाट धरली, पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना सोबत घेत आज पहाटे ६ वाजता इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथे जाऊन छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांची भेट घेतली.
जवळपास दोन तास घोलप व पवार यांच्यात राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. अविनाश घोलप हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत असून त्यांचे पुत्र करणसिंह हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. अविनाश घोलप यांचे बंधू अमरसिंह घोलप हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते.अविनाश घोलप कुटुंबियांनी नेहमीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची साथ दिली आहे. घोलप हे महायुतीतील महत्त्वाचे नेते असून त्यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात याचा महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांना फायदा होणार आहे. अविनाश घोलप यांची सहकारी संस्थांवर पकड असून आगामी काळात होणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घोलप यांच्यावर मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यावेळी अविनाश घोलप, सभापती करणसिंह घोलप, आदित्य घोलप, सूनंदादेवी घोलप, वंदनादेव घोलप,पूजा घोलप-वाघ,संचालक अनिल बागल,बी.के. सपकल,दत्तात्रय सपकल,रणजित घाडगे,सरपंच रविंद्र यादव उपस्थित होते.