विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठींवर आणि संपर्क साधण्यावर भर दिला आहे.अजित पवार यांनी मागील दोन दिवसांपासून बारामतीतच तळ ठोकला आहे. या वेळी त्यांनी विविध लोकांशी संवाद साधला. चर्चा, सभा, मेळावे, भेटींसह डिनर डिप्लोमसीही साधली. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदारसंघातील विविध घटकांच्या संपर्कावरही त्यांनी भर दिला आहे.
इंदापुरात शुक्रवार १९ एप्रिल रोजी संध्याकाळी दोन दिग्गज नेत्यांच्या मध्ये स्नेहभोजन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री “बंगलो” या ठिकाणी बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ व जय पवार यांना घेऊन उपस्थित राहणार आहेत.यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ते काय भूमिका घेणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून होते. परंतु माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम करण्याचे निश्चित केले आहे. यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे इंदापुरात एक लाखाहून अधिक मतदान आहे, विविध संस्थांवर त्यांची पकड आहे. त्यांची कन्या अंकिता पाटील- ठाकरे यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये काम केले असून त्या सध्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या पुणे जिल्हाध्यक्ष आहेत तसेच पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील विविध संस्थांवर पदाधिकारी असून युवा मोर्चाच्या माध्यमातून ते सध्या कार्यरत आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मानणारा इंदापुरात मोठा वर्ग असून याचा निश्चित फायदा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना होणार आहे.