विजय शिंदे
सुनेत्रा काकी निवडणुकीत उभ्या राहिल्यात पण मला असं वाटत की, माझी आई उभी राहिली आहे. नाराजी दूर झाली आहे, काही उरलेली आहे ती आता दूर झालेली पाहायला मिळेल असे मत पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे यांनी व्यक्त केले. इंदापुरातील पाटील कुटुंबियांच्या भूमिकेमुळे हर्षवर्धन पाटील माझे भाऊ आहेत म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी अंकिता पाटील-ठाकरे बोलत होत्या.
बारामती लोकसभेची निवडणूक सर्वात चर्चेची निवडणूक ठरणार आहे. बारामतीमधील पवार कुटुंबातील या लढतीकडे देशाचे नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. बारामती हा पवार कुटुंबाकडे वर्षानुवर्ष राहिलेला मतदार संघ आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली. इंदापुरात झालेल्या जाहीर सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे माझे भाऊ आहेत अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली, परंतु या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांची भूमिका व पक्ष वेगळे असल्याने नेहमीच बहिणीला मदत करणारे हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेमुळे सुळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यावेळी बोलताना अंकिता पाटील-ठाकरे म्हणाल्या, निधीत अन्याय झाला, खोट्या केसेस झाल्या. परंतु कार्यकर्त्यांची नाराजी आता दूर झाली आहे, काही उरलेली आहे ती आता दूर झालेली पाहायला मिळेल.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायच आहे. आमचा आणि बारामतीच्या पवारांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या सुरू आहे. कार्यकर्त्यांचे भरपूर प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली होती. आज अजित दादा आले आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल.
महायुतीचा धर्म फक्त आम्ही पाळणार नाही तर सगळ्यांनीच पाळायचा आहे. इंदापुरात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं आहे.