बारामतीत सुप्रियाताई की सूनेत्रा वहिनी;पराभव कुणाचाही झाला तरी जिंकणार भाजपच!

विजय शिंदे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दैवत मानणारे अजित पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना दैवत मानू लागले आहेत. अजित पवारांनी आता बारामती स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे आणि त्यासाठी निवड केली आहे ती, त्यांच्याच पत्नीची. सुनेत्रा पवार यांची…

जनसंघापासून ते आजपर्यंत बारामती जिंकण्याची भाषा सातत्याने विरोधी पक्ष करत राहिले. १९७७ चा अपवाद वगळता बारामतीकर नेहमी शरद पवारांच्या पाठीशीच उभे राहिले. मधल्या काळात देशामध्ये काँग्रेसचे वर्चस्व कमी होत गेले आणि भाजपाला संधी मिळत गेली. आता तर देशामध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप बनला आहे. अशा परिस्थितीत भाजपचा उत्साह वाढवला, तो काँग्रेसच्या गांधी परिवाराचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या अमेठीतत्या विजयाने आणि राहुल गांधी यांच्या पराजयाने!

साहजिकच भाजपचे लक्ष आता गेले अनेक वर्ष अपराजित राहिलेल्या पवारांकडे वळले आहे. भाजपने २००९ पासून तयारी केली, मात्र यश आले नाही. भाजपसह इतर पक्ष एकत्र येऊनही पवारांना पराभूत करू शकले नाहीत. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल, तर फोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबावी लागेल, हे लक्षात घेऊन भाजपने पवारांचे घरच फोडले. पवारांचे घर फुटले आणि आता भाजप विनासायास बारामतीवर कब्जा करण्याची भाषा करू लागले आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे. शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी मागील वर्षी वेगळी चूल मांडली आणि आता तर ते थेट काकांना शह देण्याच्या तयारीत आहेत.

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार थेट लढत
यंदा बारामतीत पवार कुटुंबातच लढत होत आहे. त्यामुळे राज्यातील इतर ठिकाणी ज्याप्रमाणे कुटुंबाकुटुंबामध्ये कलह होऊन राजकीय वैरत्व निर्माण झाले आणि त्यातून नातीगोती विसरून एकमेकांविरुद्ध राजकीय घराणे उभी राहिली. त्याचाच पायंडा आता बारामतीत पडला आहे, कारण आत्तापर्यंत म्हणजे अगदी मागील वर्षापर्यंत शरद पवारांना दैवत मानणारे अजित पवार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना दैवत मानू लागले आहेत. अजित पवारांनी आता बारामती स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे आणि त्यासाठी निवड केली आहे ती, त्यांच्याच पत्नीची. सुनेत्रा पवार यांची…

कोण कोणावर पडणार भारी…

मध्यंतरी सरकारमध्ये सत्तापालट झाला आणि अजित पवार भाजप सोबत जाऊन बसले. कर्जतमधील मेळाव्यात अजित पवारांनी बारामती सुद्धा लढणार असल्याची घोषणा केली आणि मग उमेदवार कोण त्याची चाचपणी सुरू झाली. घरातीलच उमेदवार असावा असा आग्रह भाजपने केला असावा, त्यातूनच अजित पवारांनी सुनेत्रा पवारांचीच निवड केली. सुनेत्रा पवारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली आहे. २०१४ मध्ये गाफिल राहिलेल्या राष्ट्रवादीला म्हणजेच सुप्रिया सुळेंना महादेव जानकर यांनी तगडी लढत दिली होती. महादेव जानकर यांचा पराभव अवघ्या ६९ हजार ६६६ मतांनी झाला. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी खडबडून जागी झाली आणि मागील निवडणुकीमध्ये म्हणजेच २०१९ मध्ये दौंडच्या आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने कमळाच्या चिन्हावर उभे केले, तेव्हा राष्ट्रवादी सजग असल्याने राष्ट्रवादीने तगडा प्रचार केला आणि सुप्रिया सुळे या कांचन कुल यांच्या विरोधात १ लाख ३० हजार मताधिक्याने निवडून आल्या.

बलाबल कसे आहे?

आता फरक बराच पडला आहे. कारण हक्काच्या बारामती आणि इंदापुरातील आमदार म्हणजेच अजित पवार व दत्तात्रय भरणे आता सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आहेत. एकेकाळी फक्त दोनच मतदारसंघ विरोधात असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात आता चार मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात आहेत. त्यापैकी दोन हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर दोन भाजपचे आहेत. यामध्ये दौंडचे आमदार राहुल कुल आणि खडकवासला आमदार भीमराव तापकीर यांचा समावेश आहे. उरलेल्या दोन मतदार संघात म्हणजेच भोरवेल्हा व पुरंदर या तालुक्यात काँग्रेसचे आमदार आहेत.

या मध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी आमदार रमेश थोरात हे सर्व महायुती मध्ये आहेत या मुळे सुनेत्रा पवार यांची बाजू भक्कम आहे.

अशा परिस्थितीत एकही स्वतःचा पक्षाचा लोकप्रतिनिधी नसल्याने सुप्रिया सुळे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे गेली ४० वर्ष राजकारणात असले व अनेक वेळा सत्तेत असले तरी देखील अजित पवारांनाही त्यांच्या पक्षाची नव्याने पुर्नंबांधणी करावी लागणार आहे. बहुसंख्य पदाधिकारी व नेतेमंडळी अजित पवारांच्या पाठीशी आहेत. त्यात अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. अजित पवारांनी कोणत्याही परिस्थितीत सुप्रिया सुळेंचा पराभवच करायचा असा चंग बांधला आहे आणि त्यासाठीच ते दररोज वेगवेगळ्या नेत्यांना भेटत आहेत, चर्चा करत आहेत.
माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

नेमकं काय होणार? भाजप कसं जिंकणार?

गेली ३० वर्षे भारतीय जनता पक्षाने बारामतीची जागा ताब्यात घेण्यासाठी व बारामतीवरचे पवारांचे वर्चस्व उलथवून टाकल्यास आपोआपच राज्यातही पवारांना नामोहरण करता येईल, हा भाजपच्या धुरीणांचा कयास आहे. त्यातूनच भाजपने सातत्याने नवनवे प्रयोग केले. आता मात्र त्यांचा प्रयोग हा पवार कुटुंबासाठी घातकी ठरला आहे. कारण पहिल्यांदाच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले कुटुंब भारतीय जनता पक्षाने लिलया फोडले आहे. म्हणजेच त्यांची ताकद कमी केली आहे आणि त्यांना त्यांच्यातच झुंजवत ठेवत राज्याच्या इतर भागातील आपले शक्ती केंद्र वाढविण्यावर भर दिला आहे.

बारामतीत कोणीही निवडून आले, तरीदेखील विजय भाजपचाच आता अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार हरल्या तर विकासाचे स्वप्न घेऊन सातत्याने कामात मग्न असणारे अजित पवार बॅकफूटवर जाऊ शकतात. तसेच पुत्र पार्थ पवार यांच्या मावळमधील पराभवानंतर पत्नीचाही पराभव त्यांना खूप वेदना देणारा असेल.
तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला, तर गेली ५० वर्षे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा कायम जपून ठेवलेले, सहकाराच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले शरद पवारांसारखे लोकाभिमुख नेतृत्व संपेल असा भाजपचा होरा आहे. एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघात कोणीही निवडून आले, तरीदेखील विजय भाजपचाच होणार आहे.कारण सुप्रिया सुळे निवडून आल्या तर अजित पवारांच्या नेतृत्वाला मोठा फटका बसेल आणि सुनेत्रा पवार निवडून आल्या, तर शरद पवारांसारख्या देशाच्या राजकारणाच्या स्तरावर दीर्घकाळ मानले गेलेले नेतृत्व त्यालाही मोठा फटका बसणार आहे. मात्र या दोन्ही नेतृत्वाला कमकुवत करून भाजपला आत्तापर्यंतचे आपले इप्सीत साध्य करायचे आहे आणि ते कसेही करून साध्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here