विजय शिंदे
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे गुरुवारी (दि. २५) श्री संत तुकाराम महाराज ३३९वा पायीवारी पालखी सोहळा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखीचा २८ जूनला दुपारी प्रस्थान सोहळा होईल, तर १६ जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होईल.
१६ जुलै ते २१ जुलैपर्यंत पालखी येथे मुक्कामी असेल. २१ जुलैला पालखी दुपारी पंढरपूरहूनदेहूकडे मार्गस्थ होऊन ३१ जुलैला दुपारी २ वाजेपर्यंत श्री क्षेत्र देहूगाव येथे परतेल. पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांनी ही माहिती दिली. यावेळी श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे व विश्वस्त संजय महाराज मोरे उपस्थित होते.
नव्याने बांधलेल्या मंदिरात विसावा
पालखी सोहळा प्रथमच पंढरपूर येथे नगरप्रदक्षिणा मार्गावर नव्याने बांधलेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या मंदिरात विसावेल.
असा असेल पालखी सोहळ्याचा कार्यक्रम
पालखीचे प्रस्थान शुक्रवारी, २८ जूनला होईल. पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल. शनिवारी, २९ जूनला पालखी पहिल्या अभंग आरतीसाठी अनगडशहा बाबा दर्गाजवळ, तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल. संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुक्कामाला थांबेल.
३० जून व १ जुलैला पालखी पुण्यात नाना पेठेतील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. २ जुलैला पालखी पुण्यातून लोणी काळभोरकडे रवाना होईल व येथेच नव्या पालखी तळावर मुक्कामी राहिली. ३ जुलैला यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल.
४ जुलैला पालखी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल. ५ जुलैला उंडवडी गवळ्याची येथे मुक्काम असेल. ६ जुलैला बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात, तर ७ जुलै रोजी सणसर येथे मुक्काम असेल. ८ जुलैला बेलवडी येथे पहिले होईल व पालखी रात्री आंथुर्णे येथे मुक्कामी असेल. ९ जुलैला पालखी निमगाव केतकी येथे मुक्कामी असेल. १० जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल.
१२ जुलैला सकाळी महाराजांच्या पादुकांना सराटी येथे नीरा स्नान घालून पालखी पुढे अकलूजकडे मार्गस्थ होईल व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल. १३ जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल. त्यानंतर बोरगाव येथे मुक्काम असेल. १४ जुलैला सायंकाळी तोंडले बोंडले येथे धावा होईल व पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी खाना होईल. १५ जुलैला सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल.
१६ जुलैला पालखी सकाळी बाखरी येथून पंढरपूरकडे रवाना होईल व सायंकाळी पादुका आरतीस्थळी शेवटचे व तिसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल. २१ जुलैला पालखी देहूकडे परतीचा प्रवास सुरू करेल.