विजय शिंदे
सोलापूरमधील माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा ‘म्हातारा’ असा उल्लेख करत त्यांच्यावर तोंडसूख घेतले होते.
तर याच भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत असताना त्यांनी ईडीवर वादग्रस्त विधान केले आहे. या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी यावर टीका केली आहे.
काय म्हणाले सदाभाऊ खोत ?
सदाभाऊ खोत म्हणाले, “कुणी काहीही म्हणू द्या, पण देवेंद्र फडणवीस यांना मानतो. लोक म्हणतात काही झालं तरी ईडी मागे लावतात. पण मी म्हणतो ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहीजे. नाहीतर घाबरून मेला पाहीजे.” सदाभाऊ खोत यांच्या विधानामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे.
माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या विधानावर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीका केली. ते म्हणाले, सदाभाऊ खोत म्हणतात, ईडीची अशी भीती दाखवा की, गडी एकतर घाबरून महायुतीत आला पाहीजे नाहीतर कोलमडून पडला पाहीजे. माननीय सदाभाऊ खोत यांना मी विनम्रपूर्वक सांगू इच्छितो. या महाराष्ट्राने आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही पाहिली. पण या शिवजन्मभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा असा अंगार निर्माण केला की, जेवढी दडपशाही कराल, तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही. तुम्ही अशी अरेरावी करणार असाल तर मराठी माणूस उसळल्याशिवाय राहणार नाही.