विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.आरक्षणाच्या मुद्यावरून या निवडणुका गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडल्या आहेत.
या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी तयारी केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी सुरू होण्याची चिन्हे आहेत. इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्व निवडणुका ताकदीने लढण्याचे संकेत लोकसभा निवडणुकीतून मिळाले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे.इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांचे वर्चस्व आहे. सर्व प्रमुख संस्था या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची संख्या सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती व भरत शहा यांच्या माध्यमातून इंदापूर नगर परिषदेवर वर्चस्व आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे कार्यकर्त्यांची नवीन फळी तयार झाल्याने त्यांच्याकडे नवीन नेतृत्व करण्याची संधी तरुणांना आहे.
यामुळे इंदापूर तालुक्यात आगामी काळात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तिरंगी होण्याची शक्यता आहे.