लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महायुतीतील पाटील- भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई.

विजय शिंदे

बारामती लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी हातात हात घालून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करत होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे हे कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावरून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करत होते.परंतु लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी व कार्यकर्त्यांच्या बोटावरची शाई जाण्यापूर्वीच इंदापुरात पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाण्यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला आहे.

“उन्हाळ्यात” पण मामांमुळे कॅनलला पाणी

आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांनी “उन्हाळ्यात” पण मामांमुळे कॅनलला पाणी, अशा आशयाचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे फोटो आहेत. या बॅनर वरती अजितदादा व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार व तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून ५९/५७/५४ या सर्व शेतीसाठी पाणी देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या आहेत याबद्दल मामांचे आभार अशा आशयाचे बॅनर आहेत.

 हर्षवर्धन भाऊ मुळे कॅनलला पाणी..

राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार व तालुक्याचे विकासरत्न हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून आपल्या तालुक्यातील ५९/५७/५४ या सर्व शेतीसाठी पाणी देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गाला देण्यात आल्या आहेत त्याबद्दल देवेंद्र फडणवीस व हर्षवर्धन पाटील यांचे आभार आशा आशयाचे बॅनर आहेत.

लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वीच महायुतीतील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनरबाजी रंगली आहे.

इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये विकास निधी, पाण्याच्या प्रश्‍नावरून कायम श्रेयवाद पाहायला मिळतो. या श्रेयवादावरून दोघांमध्ये टीकाटिप्पणीचे राजकारण सुरू असते.

 खासदार सुप्रिया सुळे यांच्या आभाराचे ही बॅनर…

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश मिळाले असून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांचे मनापासून आभार अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस (sp) चे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी पण सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here