विजय शिंदे
पाच दिवसांपासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. भिगवण व परिसरातील तक्रारावाडी, मदनवाडी, डिकसळ (ता.इंदापूर) येथे वादळी वाऱ्यासह ४० मिमी इतका मुसळधार पाऊस झाला.
या पावसामुळे अंबा, केळी, आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. बारामती, गिरीवन येथे चांगला पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. इंदापूर भागात वादळी वाऱ्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
जिल्ह्यात सोमवारी (ता.१३) सकाळपासून काही अंशी ढगाळ वातावरण होते. परंतु नऊ वाजल्यानंतर काही प्रमाणात ऊन पडले होते. दुपारी चारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी धावपळ झाली. मात्र या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा तयार झाल्याने कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे.