विजय शिंदे
पुणे : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. पुणे, बारामती व शिरुरचे मतदान चौथ्या टप्प्यामध्ये पार पडले आहे. पुण्यामध्ये चुरशीची लढाई झाल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाच्या निकालामध्ये लागले आहे. मात्र पुण्यामध्ये काही उत्साही कार्यकर्त्यांनी शिरुरचे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर लावण्यास सुरुवात केली आहे.
यापूर्वी देखील पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ, संजय वाघोरे आणि रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. येत्या ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीसह महाविकास आघाडीमधील उमेदवारांची विजयी पोस्टर लावण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी सारसबाग परिसरामध्ये विजयाचे पोस्टर झळकले होते. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड परिसरामध्ये देखील पोस्टरबाजी चालू झाली आहे.
शिरुरमध्ये अजित पवार गट व शरद पवार गट यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. शिरुरचा गड कोल्हे राखणार की आढळराव पाटील यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागामध्ये पोस्टर झळकत आहे. मोशी परिसरातील शरद पवार गटाच्या उप शहर संघटिका रुपाली परशुराम आल्हाट यांनी अमोस कोल्हे यांच्या विजयाचे बॅनर्स लावले आहेत. अमोल कोल्हे यांचे शिरुर लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल अभिनंदन असा आशय होर्डिंगवर लिहिण्यात आला आहे.