विजय शिंदे
मे महिना चालू असल्याने पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील २१ गावांना दररोज ४३ टँकरने ११७ खेपा पाणी पुरविले जात आहे. तर आठ गावांचे टँकर मागणी प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.सध्या सोलापूरला उजनीचे पाणी पिण्यासाठी नदीतून सोडण्यात आल्याने, टंचाईची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवाय टँकर भरण्यासाठीच्या स्रोतांची पाणी पातळी घटली जाणार असून, पाण्याचे स्रोत मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.
तालुक्याच्या एका बाजूला नीरा नदी, दुसऱ्या बाजूल भीमा नदी आहे. दोन्ही नद्यांमध्ये नीरा डावा कालवा व खडकवासला कालवा आहे. मात्र तालुक्यातील ठरावीक पट्टा कायम अवर्षण प्रवण क्षेत्र राहिला आहे.
सध्या या भागातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सन २०१८मध्ये टंचाईची स्थिती निर्माण झाल्यानंतर तालुक्यात ६२ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. यंदाही पावसाचे प्रमाण कमी असल्याने, टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी
उजनीलगतच्या गावांतूनही होणार टँकरची मागणी होत आहे. उजनी धरणामध्ये तालुक्यातील २८ गावे बुडित, तर ५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना उजनीच्या पाण्याचा हक्काचा व कायमचा स्त्रोत आहे.