विजय शिंदे
राज्यात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यात राहिलेल्या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाचे ७ मे रोजी मतदान पार पडले.सर्व टप्पे पार पडल्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावले जात आहेत. भोर तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे आणि अभिनंदनाचे बॅनर लागले आहे.
पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहे. “सुप्रिया सुळे यांची बारामती लोकसभा खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, गुलाल आपलाच..”कोण म्हणतोय येत नाय, आल्याशिवाय राहत नाय”, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना होतोय. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलेले आहे. त्यातच निकाल आधीच पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचे फलक लागल्यानं, हे फलक रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.