विजय शिंदे
इंदापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊसासह वादळी वाऱ्यामुळे उजनी धरण पाणलोट क्षेत्रात कुगाव हून कळाशीकडे येणारी बोट (लांस) पाण्यामध्ये पलटी होण्याची घटना आज घडली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी व वेदना देणारी आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी कळाशी येथे घटनास्थळी धाव घेतली व स्वतः जिथे जाऊन प्रशासनाशी संपर्क करून त्वरित मदत पोहोच करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी दिली. या दुर्दैवी घटने संदर्भात युद्ध पातळीवरती मदत व बचाव कार्य सुरू आहे.तसेच NDRF ची तुकडी रात्री उशिरा पर्यंत येणार असल्याचे देखील यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
या संदर्भात इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांचेसह इतर विभागाच्या शासकीय यंत्रणेची संपर्क साधून मदत कार्य करणे संदर्भात माहिती घेऊन सूचना दिल्या आहेत.
कुगावकडून कळाशीच्या दिशेने जाणारी बोट मध्यभागी नदीपात्रात आल्यानंतर अचानक हलका पाऊस व जोरदार वारा सुटला. त्यामुळे रौद्ररुप धारण केलेल्या लाटांचे पाणी बोटीत शिरले व बोट जागेवर फिरली. बोटीत पाणी शिरल्याने दोन चिमुकले सोडून सर्वजण बोटीतून पाण्यात उतरले. त्यावेळी त्या सर्वांनी बोटीला सावरण्याचा प्रयत्न केला. हा जीवन मरण्याचा संघर्ष जवळपास दहा ते १५ मिनिटे सुरू होता. मात्र, जोराच्या वादळामुळे त्यांची झूंज अपयशी ठरली व पाणी शिरलेली बोट पात्रात बुडाली. यावेळी ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलिस उपनिरीक्षक डोंगरे यांनी पोहत पोहत काठ गाठला व स्वतःचा जीव वाचविला. ही सर्व थरार त्यांनी कथन केला.गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत