विजय शिंदे
दहा वर्ष सत्तेत असणारी भाजपची कारकीर्द महाराष्ट्राच्या पचनी पडली आहे का? याचा निकालच जनता ४ तारखेला देणार आहे. फोडाफोडीच्या राजकारणाचा शिंदे गट आणि अजित पवार गट यांना लोकसभेला फटका बसल्याच्या चर्चा असताना सत्ताधारी महाराष्ट्रात किती जागांवर निवडून येतायत. कोणत्या दिग्गजांना लोकसभेत पराभवाचा धक्का बसतोय? तेच अंदाजे सविस्तर पाहूयात.
१) पहिला मतदारसंघ येतो तो नागपूरचा आरएसएसचं मेन सेंटर, भाजपचं होम ग्राउंड आणि देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या राजकारणातील स्थानामुळे नागपूरमध्ये भाजपला नेहमीच एक हात जास्तीचा मिळतो. म्हणूनच काँग्रेसच्या विकास ठाकरेंच्या विरोधात यंदाही नितीन गडकरी मोठं लीड घेतील, असं बोलले जातंय.
२)दुसरा मतदारसंघ आहे भंडारा-गोंदियाचा…इथले भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुनील मेंढे असले तरी काँग्रेसचा या मतदारसंघातील केडर बराच स्ट्रॉंग आहे. त्यामुळे भाजपच्या सुनील मेंढें आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यातील लढत घासून झाली. सुनील मेंढे यांच्या विरोधात अँटी इन्कमबन्सी असली तरी देखील भाजपने लावलेली ताकद पाहता निसटत्या हाताने का होईना पण मेंढे जिंकतील, असं बोललं जातंय.
३)तिसरा मतदारसंघ आहे चंद्रपूरचा विदर्भातल्या या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलय. कारण इथे काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार रिंगणात उतरले होते. बाळू धानोरकर यांच्या विषयीची सहानुभूतीची लाट, मतदारसंघात रुजलेला काँग्रेसी विचार, मोदींचा गायब झालेला करिष्मा हे सगळं चंद्रपुरात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार होतं. त्यात मुनगंटीवारांकडून करण्यात आलेल्या विखारी प्रचार त्यांच्यावरच बूमरँग झाल्याने चंद्रपुरात या बड्या नेत्याला धक्का बसत पंजा फिक्स असं सध्या वातावरण आहे.
४) चौथा मतदारसंघ आहे गडचिरोली – चिमूर भाजपचे स्टॅंडिंग खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे संजय किरसान यांच्यातील ही लढत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ भाजपासाठी वन साईड होता. मात्र आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांना हात घालत प्रचारात काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामूळे गडचिरोलीची लढत तुल्यबळ झाली. मात्र निकाल काँग्रेसच्या बाजूने जाऊ शकतो.
५) पाचवा मतदारसंघ आहे अमरावतीचा…काँग्रेसकडून बळवंत वानखेडे विरुद्ध भाजपकडून नवनीत राणा अशी ही इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळाली. प्रहारच्या दिनेश बुब यांनी या लढतीला आणखीनच कडवं बनवलं. राणा या मतदारसंघातील प्रॉमिनंट चेहरा असल्या तरी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच वातावरण काँग्रेसच्या बाजूने होतं. त्यात वंचित, आनंदराज आंबेडकर यांच्या एक्झिटमुळे मत विभाजनाचा भाजपला बसू शकणारा संभाव्य फटका टळला. याउलट प्रहारने राणांच्या पारड्यातील मतं आपल्या बाजूला घेतल्याने अमरावतीत यंदा बळवंत वानखेडे निवडून येतील, अशी चर्चा आहे.
६) सहावा मतदारसंघ आहे अकोल्याचा भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून स्वतः प्रकाश आंबेडकर इथून मैदानात होते. अकोल्यात वंचितची हक्काची वोट बँक असल्याने अभय पाटील आणि आंबेडकर यांच्यात मोठ्या प्रमाणावरील मत विभाजन यंदाही पाहायला मिळेल. दोघांची भांडण तिसऱ्याचा लाभ असं जे काही चित्र २०१९ ला पाहायला मिळालं अगदी तशीच सेम टू सेम परिस्थिती असल्यामुळे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विजयाचा मार्ग इथे सोपं झालंय…
७) सातवा मतदारसंघ आहे वर्धा वर्ध्यात कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत झाली. भाजपचे स्टॅंडिंग खासदार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे अमर काळे यांच्यात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत बरंच घमासान झालं. शरद पवारांनीही अमर काळेंसाठी बरीच फिल्डिंग लावली. जातीय समीकरण, महायुतीची मतदार संघातील ताकद आणि बूथ मॅनेजमेंट यामुळे वर्ध्यात पुन्हा एकदा कमळ दिसणार, असं चित्र आहे…
८) आठवा मतदारसंघ आहे तो नांदेडचा…भाजपचे स्टॅंडिंग खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी ही लढत झाली. चिखलीकर यांच्या स्वतःच्या अशा एक इमेजसोबत भाजपचा बॅकअप चांगला लागल्याने नांदेडमध्येही पुन्हा एकदा कमळच फुलण्याचे चान्सेस जास्त आहेत.
९) नववा मतदारसंघ आहे. तो साताऱ्याचा छत्रपती उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त अटीतटीची लढत झाली. साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार विरुद्ध उदयनराजेच एकमेकांच्या विरोधात होते. तेव्हा श्रीनिवास पाटलांना पुढे करत अजितदादांनी उदयनराजेंना धक्का दिला. यंदाही तिकीट मिळवण्यासाठी लागलेला वेळ आणि शशिकांत शिंदेंनी शरद पवारांना सोबत घेत केलेला वादळी प्रचार यामुळे साताऱ्यात तुतारी वाजणार, हे जवळपास प्रत्येकाच्या तोंडी आहे…
१०) दहावा मतदारसंघ आहे माढाचा माढा हा तसा भाजपसाठी यंदा सोपा गड समजला जात होता. पण धैर्यशील मोहितेंनी तुतारी हाती घेतल्यानंतर मतदारसंघातील समीकरण बदललं. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना बळ देण्यासाठी मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत सर्वांनी सभा घेतल्या. पण मतदारसंघातील मोहित्यांचे प्रस्थ त्याला मिळालेली शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट यामुळे माढ्यात तुतारी फिक्स वाजतेय, असा अंदाज आहे.
११)अकरावा मतदारसंघ आहे सोलापूरचा.. भाजपकडून राम सातपुते तर काँग्रेसकडून प्रणिती शिंदे हे दोन्ही नवखे चेहरे लोकसभेसाठी देण्यात आले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात गेली दोन टर्म भाजपचा दबदबा असला तरी यंदा वार फिरलं होतं. दलित, मुस्लिम मतं आणि मोहितेंमुळे मराठा मतं शिंदेंच्या बाजूने झुकल्याने सोलापुरात यंदा काँग्रेसला अप्पर हँड होता. त्यात सातपुतेंच्या प्रखर हिंदुत्वाचा मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळालं नाही. त्यामुळे सोलापुरात पंजा जिंकतोय, अशी परिस्थिती निर्माण झालीय.
१२) बारावा मतदारसंघ आहे सांगलीचा सांगलीत संजय काका पाटील यांच्या विरोधात अँटी इनकंबनसी होती. त्यामुळे काँग्रेसला इथून निवडून येण्याची फुल शॉरिटी होती. पण चंद्रहार पाटलांच्या हाती मशाल देत ठाकरेंनी सांगली प्रतिष्ठेची केली. त्यामुळे विशाल पाटलांनी केलेले बंड, वंचितनं दिलेली त्यांना साथ आणि नो मशाल ओन्ली विशाल हा संपूर्ण प्रचारात दिली जाणारी घोषणा पाहता विशाल मशाल विझवत इथं खासदार होतील, असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे.
१३) तेरावा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्गचा नारायण राणेंच्या विरोधात ठाकरेंचे विनायक राऊत मैदानात असल्याने इथला निकाल काय लागेल याची पुऱ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे. राज ठाकरेंपासून ते शिंदेंच्या नेत्यांनी राणेंसाठी जीवतोड मेहनत घेतली असली तरी ठाकरेंचा बाजूने असणारा सायलंट व्होटर आणि महाविकास आघाडीने लावलेली ताकद पाहता विनायक राऊतांची मशाल आघाडी मिळवेल, असा अंदाज आहे.
१४)चौदावा मतदारसंघ आहे रावेरचा रक्षा खडसे विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पवार यांच्यात इथून लढत झाली. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपवासी झाल्याने तुतारी इथून बॅकफुटला गेली. श्रीराम पाटील यांच्यासाठी राजकारण नवं कोरं असल्यानं त्यांनी त्यांच्या परीने प्रचारात जीव ओतला होता. पण जातीय समीकरण, नाथाभाऊ यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी असणारे संबंध आणि भाजपचं केडर पाहता रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार होतील, असं बोललं जातंय…
१५) पंधरावा मतदारसंघ आहे जळगावचा…उन्मेष पाटील यांच्या खेळीने ठाकरेंना करण पवार हा आयात उमेदवार मिळाला तर भाजपने स्मिता वाघ यांना मैदानात उतरवलं. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असल्याने जळगाव भाजपासाठी सेफ समजला जात होता. पण केळी आणि शेती प्रश्नावरून तयार केलेलं वातावरण, उन्मेष पाटील यांनी केलेल्या कामांचा सातबारा आणि महाविकास आघाडीने दाखवलेली एकजूट यामुळे जळगावात मशालीचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
१६)सोळावा मतदारसंघ आहे जालन्याचा…आपल्या सलग सहाव्या टर्मसाठी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांच्या विरोधात लोकसभेला दंड थोपटले. मराठा आरक्षण हा जालन्याच्या संपूर्ण प्रचारातील ज्वलंत मुद्दा राहिला. दानवे यांच्या विरोधात मतदारसंघात यंदा बरीच नाराजी होती. पण या नाराजीचं आपल्या बाजूने कन्वर्जन करायला कल्याण काळे यांना म्हणावं असं यश येताना दिसलं नाही. मराठा मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा दानवेंच्या पथ्यावर यंदाही पडतोय, असं चित्रं आहे.
१७)सतरावा मतदारसंघ आहे पुण्याचा…भाजपकडून मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर वंचितकडून वसंत मोरे अशी झालेली ही लढत…भाजपचा बालेकिल्ला, स्ट्रॉंग केडर, शहरी मतदान, आमदारांची पाठीशी असणारी संख्या हे सगळं मोहोळांना पुण्यातून प्लसमध्ये ठेवणारं होतं. पण धंगेकरांची ताकदही इथ जोरात होती. कसब्याच्या पोटनिवडणुकीमुळे जायंट किलर ठरलेल्या रवींद्र धंगेकर यांनी इथे भाजपला कडवी टक्कर दिली. पण अगदी निसटत्या मतांनी मोहोळ इथून विजयी होतील, अशी परिस्थिती आहे.
१८) अठरावा मतदारसंघ आहे अहमदनगरचा…भाजपने २०२४ लाही सुजय विखे यांनाच तिकीट रिपीट केल्यानं इथली स्थानिक समीकरण फिरली. शरद पवारांनी पवार गटात नाराज असलेल्या निलेश लंकेंना गळाला लावत त्यांच्या हातात तुतारी देत नगरची लढत रेसमध्ये आणली. पक्षांतर्गत नाराजीचा फटका यंदा विखेंना बसण्याची दाट शक्यता होती. तसेच लंके यांचं ग्राउंड पॉलिटिक्स स्ट्रॉंग असल्याने संपूर्ण प्रचारात ते वरचढ ठरले. त्यामुळे निकालाच्या दिवशीही निलेश लंकेंना नगरमधून अप्पर हॅन्ड मिळेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे.
१९)एकोणिसावा मतदारसंघ आहे बीडचा…भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाकडून बजरंग बाप्पा सोनवणे अशी इथली मुख्य लढत झाली. बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला असला आणि धनंजय मुंडे सोबत असतानाही ही लोकसभा निवडणूक भाजपाला जड गेली. मराठा विरुद्ध वंजारी या कास्ट फॅक्टरवर ही निवडणूक शिफ्ट झाल्याने आणि तुतारीच्या बाजूने असणारी सहानुभूती हे सगळं बजरंग बाप्पांच्या पथ्यावर पडलं. त्यामुळे ४ तारखेला मुंडेंच्या प्रस्थापित राजकारणाला इथून तुतारी मोठा धक्का देऊ शकते अशी चर्चा आहे.
२०)विसावा मतदारसंघ आहे नंदुरबारचा…भाजपकडून हिना गावित विरुद्ध काँग्रेसकडून गोवाल पाडवी अशी इथली लढत झाली. एसटी प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात भाजप बरीच स्ट्रॉंग होती. त्यामुळे विद्यमान खासदार हिना गावित त्यांनाच तिकीट रिपीट करण्यात आलं. गोवाल पाडवी यांनी इथून तगड आव्हान उभं केलं असलं तरी निकाल शेवटी भाजपच्याच बाजूने झुकताना दिसतोय…
२१)एकविसावा मतदारसंघ आहे दिंडोरीचा…इथेही कमळ विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळाली. विद्यमान खासदार भारती पवार यांनाच भाजपने तिकीट रिपीट केलं. तर मविआमध्ये ही जागा शरद पवारांच्या वाट्याला आली. पुन्हा एकदा खासदार होण्यासाठी भारती पवार यांनी जोराचा प्रचार केला असला तरी मतदारसंघात तुतारीच्या भास्कर भगरे यांची बरीच चर्चा होती. मतदानानंतर भगरे मोठ्या लीडने दिंडोरीचं मैदान मारतील, असंही आता बोललं जाऊ लागलय.
२२) बाविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्वचा…इथून भाजपने मिहीर कोटेचा तर ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. मतदानही काट्याला काटा असच झालं. पण सहानुभूतीचा फॅक्टर इथून वर्कआउट झाल्यामुळे मशालीचा उजेड इथं पाहायला मिळेल, असं राजकीय विश्लेषक सांगतायत…
२३)तेविसावा मतदारसंघ आहे मुंबई उत्तरचा…मुंबई उत्तर हा भाजपचा सर्वात सेफ मतदारसंघ. म्हणूनच पक्षाने इथून पियुष गोयल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना तिकीट दिलं होतं. इथून पियुष गोयल आरामात निवडणूक जिंकतील. फक्त काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात ते कितीचं लीड घेतायत, हेच इथून पाहिलं जाणार आहे.
२४) चोविसावा मतदारसंघ आहे लातूरचा सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजी काळगे यांच्यात झालेल्या या लढतीत काँग्रेसने काळगेंसाठी मोठी ताकद लावली होती. पण स्टॅंडिंग खासदार सुधाकर शृंगारे हे मतदानानंतर पुन्हा एकदा निवडून येतील, असं लातूरमध्ये बोललं जातंय…
२५)पंचविसावा मतदारसंघ आहे पालघरचा…भाजपने या मतदारसंघावर दावा ठोकत डॉ. हेमंत विष्णू सावरा यांना मैदानात उतरवले. आघाडीतर्फे ठाकरे गटाच्या वतीने भारती कामडी यांना अगोदरच उमेदवारी जाहीर केली. मात्र येथे ‘बविआ’ने अगदी शेवटच्या दिवशी राजेश पाटील यांना उमेदवारी दिली. आणि खरी लढत या तीन प्रमुख उमेदवारांमध्येच रंगली. मतदानानंतर या जागेवर भाजपच्या हेमंत सावरा यांचं पारड थोडं जड दिसतंय…
२६) सहविसावा मतदारसंघ आहे भिवंडीचा…तुतारीकडून बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपकडून स्टॅंडिंग खासदार कपिल पाटील यांनाच तिकीट रिपीट केलं होतं… पाटलांच्या विरोधात असणारी अँटीइन्कमबन्सी, दोन टर्म निवडून देऊनही तसाच जिवंत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे जनतेला बदल हवा होता… मनी आणि मसल पॉवर, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध आणि पवारांच्या बाजूने असणारी लाट यामुळे इथं तुतारी कन्फर्म, असं बोललं जातय…
२७)सत्ताविसावा मतदार संघ आहे उत्तर मध्य मुंबईचा भाजपकडून उज्वल निकम विरुद्ध काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांच्यात झालेली ही लढत. अगदी शेवटच्या क्षणी जाहीर झालेल्या या उमेदवारीमुळे दोघांनाही प्रचाराला अगदी थोडासा वेळ मिळाला. मात्र इथला मुस्लिम बहुल भाग आणि शिवसेनेची ताकद गायकवाड यांच्या बाजूने असल्याने पंजा निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
२८)अठ्ठाविसावा मतदारसंघ आहे धुळ्याचा धुळ्यात भाजपचे स्टॅंडिंग खासदार सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत झाली. मात्र सुभाष भामरे यांचा मतदारसंघावरचा होल्ड आणि महायुतीने दिलेली ताकद यामुळे भामरे यांना यंदाही धुळ्यामधून अप्पर हँड आहे…
२९) शिरूर इथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी काटे की टक्कर झाली .. शरद पवार गटाकडून स्टॅंडिंग खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाने शिंदे गटातून आढळराव पाटलांची निवडणुकीच्या तोंडावर आयातवारी केली… त्यांच्या हातातील शिवबंधन सैल सोडून ऐनवेळी हातात घड्याळ बांधलं… सुरुवातीला अमोल कोल्हे यांच्यासाठी लढत वन साईड वाटत होती. पण आढळरावांच्या एंट्रीने शिरूरची जागा रेसमध्ये आली…गेल्या वेळेस अजितदादा, वळसे पाटील यांनी कोल्हे निवडून यावेत, म्हणून बऱ्याच खस्ता खाल्ल्या होत्या. पण आता हेच नेते विरोधात असल्याने शरद पवारांच्या मदतीने कोल्हेंनी लोकसभेची खिंड एकाकी लढवली..जुन्नर, आंबेगाव आणि खेड या पट्टयात कांदा प्रश्न महत्त्वाचा असल्याने कोल्हेंनी कांद्याच्या प्रश्नावरून सरकारला चांगलं कोंडीत पकडलं…जातीचा फॅक्टर कोल्हेंना इथं प्लसमध्ये घेऊन जाणार असला तरी जातीपासून ते थोडे लांबच राहिले.. कारण प्रसिद्ध अभिनेते, कलाकार आणि छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी यांच्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या इमेजला यामुळे कुठेही धक्का लागला नाही. उलट समाजाने अगदी सायलेंटली कोल्हेंसाठी काम केल्याचं मतदारसंघात बोलले जातय… दुसऱ्या बाजूला कोल्हेंच्या समोर आढळराव पाटलांसारखा कसलेला नेता असतानाही त्यांचं गणितं मात्र बरेच फिस्कटलं.. सलग तीन टर्म धनुष्यबाणाच्या चिन्हावर खासदार राहिलेल्या आढळरावांना इथे निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात प्रवेश करून हातात घड्याळ घ्यावं लागलं…यामुळे त्यांच्या इमेज ला मोठा धक्का बसला… डमी उमेदवार म्हणून कोल्हे यांनाही यामुळे हातात आयात कोलीत मिळालं. थोडक्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा झालेल्या या शिरूरच्या अटीतटीच्या लढतीत तुतारीचा आवाज सध्या तरी जास्त दिसतोय…
३०) रायगड इथं अजित पवार गटाकडून सुनील तटकरे तर ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत झाली… घड्याळ विरुद्ध मशाल अशा लढत झालेल्या रायगडमध्ये मतदानाची टक्केवारी घसरताना दिसली… ठाकरेंच्या बाजूने असणारं सहानुभूतीचं वार ग्रामीण पट्टयातून गीतेंना मोठं लीड देणारं ठरलं.. तर शहरी पट्टयात घड्याळाची चलती होती. तसं पाहायला गेलं तर सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते अशी इथली पारंपारिक लढत…२०१९ ला अनंत गीते यांना पराभवाची धूळ चारत तटकरेंनी कोकणात घड्याळाची टिकटिक सुरू केली. पण मधल्या काळात बरच राजकारण बदललं. शिवसेनेतील बंडावेळेस गीते एकनिष्ठ राहिले. तर अजितदादांच्या बंडाला सुनील तटकरे यांनी हवा दिल्याने एकनिष्ठ विरुद्ध बंडखोर अशी यंदाच्या प्रचाराची बेसलाईन होती. कागदावरचं गणित पाहिलं तर तशी तटकरेंसाठी ही तशी एकहाती लढत होती. पण मशालीला महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी दिलेल्या मजबूत हातांनी वारं फिरलं. त्यात शेकापने गीतेंसाठी दिलेला मदतीचा हात रायगडच्या निकालातील महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो. शिंदे गटाच्या अनेक नेत्यांचा इथे भरणा असला तरी सामान्य शिवसैनिक हा ठाकरेंच्या बाजूने राहण्याची रायगडमध्ये शक्यता होती. कदम पितापुत्र यांनी रत्नागिरीमधून तर भरत शेठ गोगावले यांनी महाड, पेण मधून ताकद लावल्याने आणि बूथ मॅनेजमेंटवर दिलेला सर्वाधिक भर पाहता रायगडचा निकाल घासून लागेल, असं सध्यातरी दिसतंय. त्यातल्या त्यात अनंत गीते यांचा निसटत्या लीडने रायगडमधून विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय…
३१) सगळ्यांच्याच चर्चचा मतदारसंघ राहिलेला बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती. इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता. तर इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाची? कार्यकर्ते कुणाच्या पाठीशी आहेत? बारामतीचा कौल कुठल्या पवारांना जातोय? अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला. अजित पवार, शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळेच पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत होते. अजितदादांनी सहकारी संस्था, कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळ मजबूत करत बारामती, इंदापूर आणि दौंड सारख्या भागात आपलं वजन वाढवलं. घड्याळाची छाप सोडली. तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेत प्रचाराला वेगळे डायमेन्शन्स आणले. शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्याने सुनेत्राताई यांच्या बाजूने पारड झुकताना दिसलं. पण सहानुभूतीचे मत प्लस, शरद पवार समर्थक मतं, भाजप विरोधी मत, अजितदादा विरोधी मत, महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं, दलित आणि मुस्लिम मत हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसटत्या हाताने सुप्रिया ताईंच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जातोय…
३२)अजित पवार गट लढत असणारा शेवटची आणि चौथी जागा म्हणजे धाराशिवची इथं देखील रायगड प्रमाणे मशाल विरुद्ध घड्याळ अशी जोराची लढत झाली. शिवसेनेकडून स्टॅंडिंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी अजित दादांना बरीचशी चाचपणी करावी लागली… भाजपचे राणा जगजीतसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातला छत्तीसचा आकडा सगळ्यांना माहित आहेच. धाराशिवची निवडणुकही या दोघांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते. यंदा मात्र करंट लागावा असं राजकारण बदललं. जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी भाजपतून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेचं तिकीट मिळवलं… त्यामुळे पक्ष आणि चिन्ह बदलले गेले असले तरी ही लढत देखील पाटील विरुद्ध निंबाळकर अशीच झाली. कमळाच्या चिन्हावर मशालीच्या विरोधात उमेदवार उतरवला, तर त्याचा मोठा फटका बसू शकतो, असा कदाचित भाजपाचा अंदाज असावा. म्हणून त्यांनी धाराशिवमध्येही मशालीला थेट भिडण टाळलं…पण तरीदेखील ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा मोठा इम्पॅक्ट धाराशिवमध्ये पाहायला मिळाला… वाढलेली महागाई, शेतीचे प्रश्न आणि मराठा आरक्षण हे सगळे मुद्दे ओमराजे निंबाळकरांच्या पथ्यावर पडताना दिसून आलं. प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ओमराजेंनी लीड घेतली होती. तीच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंटवरही कायम ठेवल्याने इथं मशाल निवडून येतेय, असा एकूणच कल आहे…
३३)कोल्हापूरचा…. काँग्रेसनं शाहू छत्रपतींना उमेदवारी दिल्यापासूनच शिवसेनेचे संजय मंडलिक बॅकफुटला गेले होते. धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ यांनी मंडलिकांच्या पाठीशी आपली सारी ताकद लावली असली तरी बंटी पाटलांच्या यंत्रणेपुढे तिचा निभाव लागताना दिसला नाही. मान आणि मत दोन्ही गादीलाच… या स्टॅन्डमुळे कोल्हापुरातही यंदा पंजा येतोय, हे क्लिअर आहे.
३४)रामटेक रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदेंकडून राजू पारवे अशी रामटेकची लढत झाली. शिंदेंनी राजू पारवे यांच्या उमेदवारीची काँग्रेस मधून आयातवारी केल्यानं ही गोष्ट मतदारांना फारशी रुचली नाही. महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना फायदा होताना दिसला. काँग्रेसची दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक विकासाचं नरेटीव रामटेकमध्येही काँग्रेसला ४ तारखेला लीडमध्ये ठेवेल, असं इथलं चित्र आहे.
३५)कल्याण सलग दोन टर्म खासदार असणाऱ्या शिंदेच्या विरोधात ठाकरे टफ उमेदवार देतील अशी शक्यता होती. पण माजी नगरसेवक वैशाली दरेकर यांना मैदानात उतरवत ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना फ्री हिट दिलीय अशी मतदारसंघात चर्चा होती. पण प्रचारात दरेकरांनी घेतलेली आघाडी, भाजपच्या अंतर्गत नाराजीचा शिंदेंना बसलेला फटका आणि एकनिष्ठ विरुद्ध फुटीर हे मुद्दे फ्रंटला असल्याने दरेकर या रेसमध्ये आल्या.. मात्र श्रीकांत शिंदे अगदी निसटत्या लीडने कशीबशी कल्याणची जागा राखतील. अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे.
३६)ठाणे ठाकरेंकडून राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के यांच्या लढतीत राजन विचारे वन साईड मैदान मारतील, असं वातावरण प्रचाराच्या पहिल्या दिवसापासूनच ठाण्यात होतं. नरेश म्हस्के यांना प्रचाराला मिळालेला अगदी थोडा थोडका वेळ, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट आणि नरेश म्हस्के यांची उमेदवारी कनेक्ट न होण…या सगळ्या गोष्टी ठाकरेंच्या पथ्यावर पडताना दिसल्या. याशिवाय राजन विचारे यांचं मतदारसंघातील काम, मतदारांशी असणारा सुसंवाद आणि बंडाळीच्या वेळेस दाखवलेली निष्ठा यामुळे राजन विचारे मोठ्या लीडने निवडून येतील, अशी ठाण्यामध्ये चर्चा आहे.
३७) मुंबई उत्तर पश्चिमच्या या इंटरेस्टिंग लढतीत ठाकरेंकडून अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाकडून रवींद्र वायकर मैदानात होते. वायकर हे ठाकरेंचे एकनिष्ठ…मात्र इडीने चक्र फिरवल्याने त्यांना नाईलाजाने शिंदेंसोबत जावं लागलं… पक्षप्रवेश होताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगत होते… त्यामुळे शिंदेंचा फोर्स असला तरी मशालीच्या विरोधात वायकर किती ताकद लावून लढतील, हा मोठा प्रश्नच होता. हे सगळं गणित पाहता अमोल कीर्तीकर यांचे मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
३८) दक्षिण मुंबई मधून शिंदेंच्या यामिनी जाधव यांच्या विरोधात ठाकरे गटाचे स्टँडिंग खासदार अरविंद सावंत यांनी दंड थोपटले होते. राहुल नार्वेकर, मंगलप्रसाद लोढा यांनी यामिनी जाधव निवडून याव्यात, यासाठी बराच जोर लावला होता. पण मराठी विरुद्ध अमराठी, अरविंद सावंत यांनी केलेला आक्रमक प्रचार, इडीच्या कारवाईने यामिनी जाधव यांनी केलेली बंडखोरी, हे नरेटीव ठाकरे गटाने संपूर्ण प्रचारात वापरलं. मतदानानंतर इथेही ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंत निवडून येतील, अशी चर्चा आहे.
३९) मुंबई दक्षिण मध्य मध्ये ठाकरे गटाकडून अनिल देसाई विरुद्ध शिंदेंकडून राहुल शेवाळे यांच्यातील झालेली ही अटीतटीची लढत. दोन टर्म खासदार राहिलेल्या राहुल शेवाळे यांना निवडून आणण्यासाठी शिंदेंनी आपली सारी यंत्रणा कामाला लावली होती. मात्र अनिल देसाईंच्या रूपाने ठाकरेंनी दिलेला कडवा प्रतिस्पर्धी इथं महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. शेवाळेंच्या विरोधातील अँटी इन्कमबन्सी आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांचं मोठ केडर असल्याने इथे देसाईंचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत.
४०)वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ठाकरेंच्या संजय देशमुखांच्या विरोधात कडवा प्रतिस्पर्धी शोधण्याचा आव्हान होतं. मात्र अत्यंत नाट्यमयरित्या नागेश पाटील यांची हिंगोलीतील उमेदवारी रद्द करत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ मधून उमेदवारी देण्यात आली. बाहेरचे उमेदवार त्यात गद्दारीचा लागलेला टॅग यामुळे संजय देशमुख निवडणूक प्रचारापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत प्लसमध्ये राहिले. महायुतीला इथे पाठिंबा असला तरी त्याचं मतांमध्ये कन्वर्जन करण्यात राजश्री पाटील यांना यश आलं नाही, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यानंतर आता मशालीचा उजेड यवतमाळ वाशिमवर पडेल, अशी मतदारसंघात चर्चा आहे.
४१) बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, शिंदेंकडून प्रतापराव जाधव तर अपक्ष रविकांत तुपकर अशी लढत झाली. शिंदेंच्या प्रतापराव जाधव यांच्या विरोधात बुलढाण्यात अँटीइनकंबनसी होती. त्यात ठाकरे गटाकडून गद्दार विरुद्ध खुद्दार अशी प्रचाराची लाईन पुढे घेऊन गेल्यामुळे याचा मोठा फटका जाधवांना बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे इथे खरी लढत ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अशी असल्याची मतदारांच्या चर्चा आहे.
४२)हिंगोलीसाठी ठाकरेंच्या नागेश पाटील अष्टीकर यांच्या विरोधात हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी त्यांची उमेदवारी मागे घेत कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली. कागदावर येथे महायुतीची ताकद जास्त दिसत असली तरी शेती प्रश्न, मराठा आरक्षण आणि महागाई हे फॅक्टर इथे ठाकरेंना साथ देऊ शकतात. अष्टीकरांनी प्रचारात लावलेली ताकद आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीचं वातावरण पाहता हिंगोलीत मशाल फिक्स आहे, असं बोललं जातंय.
४३)अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिंदेंकडून सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरेंकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी इंटरेस्टिंग लढत झाली. वंचितकडून उत्कर्षा रूपवते इथं मैदानात उतरल्याने शिर्डीची लढत तिरंगी झाली. वंचितच्या उमेदवारीने वाकचौरे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका आणि सदाशिवराव लोखंडे हे आपल्या विकासकामांच्या जोरावर निकालात लीडला राहतील, असं सध्या शिर्डीचं वातावरण आहे.
४४) संभाजीनगर अगदी बरीच काथ्याकूट झाल्यानंतर ठाकरेंच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदेंनी संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. इम्तियाज जलील यांच्यामुळे छत्रपती संभाजी नगरची लढत ही तिरंगी आणि अटीतटीची असणार आहे. चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीची मिळालेली भक्कम साथ, प्रचारासाठी पिंजून काढलेला मतदारसंघ आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी फूटले असले तरी कार्यकर्त्यांची निष्ठा यामुळे इथे चंद्रकांत खैरे निकालात लीडला असतील, असा अंदाज वर्तवला जातोय.
४५) हातकणंगलेत झालेल्या चौरंगी लढतीत आपली विद्यमान खासदारकी टिकवण्यासाठी मानेंना बरीच कसरत करावी लागली. राजू शेट्टींमुळे तयार झालेलं कडवं आव्हान आणि ठाकरेंच्या सत्यजित पाटील यांचा मतदारसंघावरचा होल्ड यामुळे इथे काटे की टक्कर होती. मानेंच्या प्रचारासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधानांनी इथं जाहीर सभा घेतली होती. पण भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा मानेंना असणारा विरोध आणि आपल्या पहिल्या टर्ममध्ये अनेक स्थानिक नेत्यांशी बिघडलेले संबंध याचा फटका मानेंना निकालात बसू शकतो.. इथं मशाल या चिन्हावर सत्यजित पाटील आघाडी मिळवतील, अशी मतदारसंघात चर्चा आहे.
४६) नाशिक राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे अशी ही लढत… राजाभाऊ वाजे यांना ठाकरेंनी केव्हाची उमेदवारी घोषित केली… पण महायुतीत छगन भुजबळामुळे नाशिकचा तिढा वाढला होता… अगदी शेवटच्या टप्प्यात भुजबळ यांनी माघार घेतल्याने गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली… मतदारसंघात स्वपक्ष आणि मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध होता… गोडसे स्थानिक राजकारणात ढवळाढवळ करतात… त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना ॲक्सेस नसतो.. अशा बऱ्याच तक्रारी त्यांच्याविरोधात होत्या… मात्र तिकिटाचा पेच वाढल्याने शेवटी ही जागा गोडसेंनाच सोडण्यात आली… आज होत असणाऱ्या या नाशिकच्या मतदानात कागदावर गोडसेंची म्हणजेच महायुतीची ताकद जास्त दिसत असली. तरी मशालीचं पारड इथं जड झालंय.
४७) परभणी हा राजकारणातील उलथापालथीचा सेंटर पॉईंट ठरला. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेली ही जागा त्यांनी महादेव जानकरांना सोडली. जानकरांच्या विरोधात ठाकरेंच्या बंडू उर्फ संजय जाधवांनी दंड थोपटले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव परभणीत जास्त दिसला नाही. ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या परभणीचा निकाल हा नेहमीच शिवसेनेच्या बाजूने राहिला. त्यामुळे जेव्हा जानकरांच्या विरोधात लढत झाली तेव्हा इथे बंडू जाधव हे दोन पाऊल पुढे दिसतायत… इथे मशालच पेटण्याची दाट शक्यता आहे.
४८)मावळमध्ये संजोग वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. बारणे तगडे उमेदवार असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अंतर्गत विरोध इथे लपून राहिला नव्हता. अजित पवार गटाने आपला म्हणावा असा प्रचार केला नाही, अशी खंत स्वतः बारणेंनीही व्यक्त केली. वाघेरे हे तसे मूळचे अजितदादांचे कार्यकर्ते असल्याने इथल्या राष्ट्रवादीच्या केडरचा सपोर्ट हा ठाकरे गटाच्या बाजूने लागल्याचं बोललं जातं. त्यात अँटी इनकमबंसीचा फटका आणि ठाकरे आणि पवारांच्या बाजूने असणाऱ्या वातावरणाचा फायदा इथे वाघेरेंना झाला. थोडक्यात संजोग वाघेरे मावळात शिंदे गटाला अनपेक्षित धक्का देऊ शकतील..