विजय शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला आहे. सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 53 हजार 48 मतांनी विजय झाला आहे.
यानंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहित अजित पवार यांनी आपल्या पक्षाची आगामी भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकले नसले तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलेही अपयश अंतिम नसते. अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने, उमेदीने सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावे व राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचे विश्लेषण केले जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे अजितदादा पवार यांनी आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनींना अजितदादा पवार यांनी धन्यवाद दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे. याशिवाय अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचेही अजितदादा पवार यांनी अभिनंदन केले आहे.
देशात लवकरच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारे ‘एनडीए’चे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, अशी खात्रीही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.