विजय शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख सशक्त नेतृत्वावर देशातील जनतेने तिसऱ्यांदा शिक्कामोर्तब करून भाजप प्रणित एनडीएकडे सत्ता सोपवली आहे. त्यामुळे विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होणार असून, जगात भारताचा दबदबा आणखी वाढणार आहे. बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय अपेक्षित होता, मात्र महाविकासआघाडीच्या सहानुभूतीच्या लाटेमुळे अनपेक्षित अशा पराभवास समोरे जावे लागले, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे नेते नसून जागतिक नेते बनले आहेत. मोदींच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून, आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले, देशाच्या सर्वच भागातून भाजपला जनतेची चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळे देशातील चोहोबाजूंनी जनता आता विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजप प्रणित एनडीए बरोबर आहे, हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.
देशातील सर्व विरोधक एकत्रित येऊनही जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास व्यक्त केला आहे. देशाची तिसऱ्यांदा सत्ता दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी 100 दिवसांचा विकासाचा रोड मॅप तयार केला आहे, त्यामुळे आगामी काळात भारत प्रगतीपथावर राहील व जनतेचा विकास वेगाने होईल, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
बारामती मतदारसंघात सहानुभूतीची लाट ही विकास कामांवर वरचढ ठरल्याचे मतदानातून दिसून आले आहे. बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व महायुतीवर विश्वास ठेवून उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान केलेबद्द्दल मतदारांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. या निवडणुकीतील त्रुटींचा आंम्ही अभ्यास करू तसेच आगामी काळात जनसेवेसाठी कोठेही कमी पडणार नाही, असेही हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
_______________________
फोटो